esakal | बलवडीत शाश्‍वत, सकस चारा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प 
sakal

बोलून बातमी शोधा

Pioneering project for sustainable, nutritious fodder production in Balwadi

तहान लागली की विहिर खणायची असे दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकारी योजनांचे स्वरुप असते. दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरु करणे म्हणजे तेच आहे.

बलवडीत शाश्‍वत, सकस चारा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प 

sakal_logo
By
अजित कुलकर्णी

सांगली : तहान लागली की विहिर खणायची असे दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकारी योजनांचे स्वरुप असते. दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरु करणे म्हणजे तेच आहे. त्यावर उपाय म्हणून कायमस्वरुपी चाऱ्याचा साठा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करायचे. त्यावर आधारित असा स्वयंनियंत्रित असा चारा उद्योग उभा करता येईल यासाठीचा पथदर्शी प्रकल्प सांगली जिल्ह्यात बलवडी येथे सुरु झाला आहे. "चारा छावणीमुक्त महाराष्ट्र' असं या प्रयोगाचे ध्येय असेल. 

पशुधन ग्रामिण जीवनाचा आर्थिक कणा. संकरित जाती, पूरक पशुखाद्य यात आधुनिकता आली तरी मुख्य अन्न चाऱ्याबाबत मात्र दृष्टीकोन पारंपारिक असतो. सकस चाऱ्याअभावी जनावरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. चार टंचाईने हा व्यवसाय वारंवार अडचणीत येतो. दुष्काळात हे संकट अधिक गडद होते. बागायती क्षेत्रातही हेच वास्तव आहे. तिथे ऊसाच्या वैरणीवर सारी भिस्त असते. ऊसातील अल्कलीमुळे जनावरांतील मूलद्रव्यांचा निचरा होतो. वांझ काळ वाढतो. जनावरांना अकाली वृद्धत्व येते. चांगली जनावरे कसायाच्या स्वाधीन करावी लागतात. दृष्टचक्र तोडण्यासाठी शाश्‍वत सकस चारा उपलब्ध झाला पाहिजे ही भूमिका या प्रकल्पाची आहे. 

उगम फौंडेशनचे ऍड. संदेश पवार म्हणाले,""चारा छावण्या तात्पुरती उपाययोजना आहे. शेतकऱ्यांना लाचार म्हणून सरकारच्या दारी उभे रहावे लागते. दुष्काळाबरोबरच एरवीही जनावरांना खात्रीने चारा पुरवू शकणारी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. व्यावसायिक तत्वावर शेतकऱ्यांतून चारा इंडस्ट्री उभी राहिली पाहिजे. 

क्रांतीस्मृतीवन परिसरात दुष्काळ निवारणाच्या उपायासाठी कायस्वरुपी प्रयोगशाळाच उभी होत आहे. निवृत्त वनाधिकारी सुभाष बडवे, राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.शंकरराव माळे, ज्येष्ठ समाजसेवक संपतराव पवार यांनी आराखडा तयार केला आहे. 25 हेक्‍टरवर प्रतिवर्षी सुमारे तीन हजार टन सकस वैरण चारा उपलब्ध होऊ शकेल. खानापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची गरज भागेल. सकस चारा तयार होऊ शकेल अशा वाणांची रोपवाटिकाही असेल. पहिल्या टप्प्यात 10 एकरावर चारा लागवड सुरु केली आहे. शासनाकडून चारा साठवणुकीसाठी गोदाम उभारणी, मशिनरी, चाऱ्याचे वाण खरेदी, साठवणूक प्रक्रिया तंत्रज्ञान यासाठी मदतीची अपेक्षा आहे.'' 

ते म्हणाले,""खानापूर तालुक्‍यासाठीचा हा प्रकल्प पथदर्शी स्वरुपाचा असेल. पुढे त्यांची सर्वत्र पुनरावृत्ती होऊ शकेल. भविष्यात दुध संघ पुढे येऊ शकतील. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डी. टी. शिर्के यांनीही प्रकल्पासाठी विद्यापीठ स्तरावरावरून प्रतिनिधी पथक पाठवून या कामी रस दाखवला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनाही सविस्तर आराखडा सादर केला आहे.'' 

निकृष्ठ चाऱ्यामुळे जनावराचं मातेरे होतंय. सकस चाऱ्याची शाश्‍वती दुष्काळातच नव्हे तर एरवीही असायला हवी. शाश्‍वत अर्थकारण मांडून भविष्यात आत्मनिर्भर अशी चारा इंडस्ट्री विकसित झाली पाहिजे. हा उद्देश ठेवून आपत्ती निवारणाची प्रयोगशाळाच उभी करीत आहोत. यंदा दहा एकर क्षेत्रात चारा लागवड करून प्रकल्पाची सुरवातही केली आहे.'' 
- ऍड. संदेश पवार, कार्यवाह, उगम फौंडेशन


संपादन : प्रफुल्ल सुतार