विवाहासाठी युवतीवर रोखले पिस्तूल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

सातारा - फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर लग्न करण्यासाठी वारंवार त्रास देत पिस्तूल व चाकूचा धाक दाखून शाहूपुरीतील युवतीला धमकावल्याप्रकरणी युवकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सातारा - फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर लग्न करण्यासाठी वारंवार त्रास देत पिस्तूल व चाकूचा धाक दाखून शाहूपुरीतील युवतीला धमकावल्याप्रकरणी युवकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शाहूपुरीतील 23 वर्षीय युवतीची जून 2015 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरबाजशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये वारंवार फेसबुक चॅटिंग झाले. चांगली मैत्री झाल्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर त्याने लग्नाबाबत विचारणा केली. त्याला तिने नकार दिला. त्यानंतर आरबाजने दुचाकीवरून तिचा पाठलाग सुरू केला. तसेच रस्त्यावर अडवून लग्नासाठी वारंवार विचारणा सुरू केली. लग्न न करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्यामुळे त्याने देवी चौक तसेच शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयाजवळ अडवून तिला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत धमकावले. तसेच तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. संबंधित युवती ज्या जीममध्ये जात होती, तेथेही जावून तो गोंधळ घालत होता. तिच्या दुचाकीची चावी हिसकावून त्रास देत होता. जून 2015 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत त्याने वारंवार अशा प्रकारे शस्त्राचा धाक दाखवत धमकावून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे संबंधित युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. महिला सहायक पोलिस निरीक्षक पी. पी. किर्दत तपास करत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस युवकाला पकडण्यासाठी गेले. परंतु, तो त्यापूर्वीच पसार झाला होता. 

Web Title: pistol on the girl for marriage in satara