पिस्तूल तस्कर मनीष नागोरीला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

एक नजर

 • तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) अटक
 • शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
 • स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात
 • ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ
 • शहापूर (इचलकरंजी) पोलिसांनी हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक 

कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले.

ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाला. त्यानंतर शहापूर (इचलकरंजी) पोलिसांनी त्याला हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक केली. 

नागोरीवर राज्यभरात तीन खुनांच्या गुन्ह्यांसह १६ हत्यार तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने विकलेल्या २०० पैकी आजअखेर ४८ पिस्तुले पोलिसांनी हस्तगत केली आहेत. अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही पोलिसांनी नागोरीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर गांधीनगर, चतुःश्रुंगी व डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचे, तर इचलकरंजी, गांधीनगर, शिरोली एमआयडीसी, शहापूर, जयसिंगपूर, पुणे, पाचगणी पोलिस ठाण्यांमध्ये हत्यार तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला इचलकरंजी प्रांतांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते. काही दिवसांपूर्वी त्याला पुणे एसआयटीने अटक केली होती. त्याच्या साथीदारांनी त्याचा जमीन मंजूर करून घेतल्याने येरवडा कारागृहातून त्याची सुटका झाली होती; मात्र कारागृह प्रशासनाने त्याच्या सुटकेची सूचना राज्यातील सर्व पोलिस अधीक्षकांना दिली होती. 

याच दरम्यान बोंजुर्डी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या विकी नाईक व सुनील घाटगे या दोघांना इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडील चौकशीत नागोरीचा कोल्हापूर परिसरात वावर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नागोरीची माहिती मिळवण्याच्या सूचना दिल्या.

शनिवारी (ता. ६) शिरोली एमआयडीसीमधील एका सीसीटीव्ही फुटेजमधून त्याची मोटार दुपारी बारा ते एकच्या दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शहरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यामध्ये सायंकाळी सातच्या सुमारास त्याची मोटार दाभोलकर कॉर्नर परिसरात होती. त्याचा कोल्हापुरातील वावर स्पष्ट होताच श्री. देशमुख यांनी सर्वच पोलिस ठाण्यांना त्याच्या मोटारीचा क्रमांक देऊन शोध मोहीम राबवण्याची सूचना केली.

त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी शोध घेत असताना त्याची मोटार मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील स्कायलार्क हॉटेलच्या पार्किंगमध्ये आढळली. पोलिसांनी हॉटेलमध्ये शोध घेतला असता खोली क्रमांक ३०८ मध्ये नागोरी सापडला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. चौकशीत त्याने आई व बहिणीला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात तडीपार असताना जिल्ह्यात वावरत असल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

इचलकरंजी - दरम्यान, नागोरीला दोन वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यानंतर तो १३ मार्च रोजी शहरात आढळून आला होता. त्याला त्यावेळी मुंबई पोलिसांनी वारंटमध्ये अटक केली होती. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी त्याला काल अटक केली होती. शहापूर पोलिसांनी आज १३ मार्च रोजी दाखल झालेल्या हद्दपार आदेशाचा भंग केल्याच्या गुन्ह्यात नागोरीला अटक केली.

दरम्यान, मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने शहापूर पोलिसांच्या मदतीने न्यायालयीन वारंटकामी नागोरीला १३ मार्च रोजी घरातून अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिस त्याला घेऊन गेले होते. त्यावेळी शहापूर पोलिसांनी नागोरीवर हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता; मात्र त्याला अटक केली नव्हती, अशी माहिती पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिली.

नाव बदलून खोली बुक 
पोलिसांनी स्कायलार्क हॉटेलवर मध्यरात्री छापा टाकला. सहायक फौजदार संदीप जाधव, प्रशांत घोलप, सागर माळवे यांनी वेटरच्या रूपात  झडती घेतली, तेव्हा नागोरी हॉटेलमध्ये खोली क्रमांक ३०८ मध्ये सापडला. अचानक वेटर आत आल्याचे पाहून त्याला शंका आली. त्याने त्यांच्याशी झटापटीचाही प्रयत्न केला. ही खोली शक्ती सिंग या नावाने एका व्यक्तीने बुक केली होती. बुकिंग दोन दिवसांचे होते. याच खोलीत नागोरी सापडल्याने पोलिसही अवाक्‌ झाले. शक्ती सिंग कोण, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमुळे मोहीम फत्ते 

 •  चंदगड तालुक्‍यातील दोघांना पिस्तूल विक्रीप्रकरणी अटक
 •  त्यांच्या अधिक चौकशीत नागोरी कोल्हापुरात, अशी माहिती 
 •  शिरोली एमआयडीसीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची मोटार कैद 
 •  संशय पक्का झाल्यानंतर पोलिसांची झटपट कारवाई
 •  मुख्य बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये मोटार सापडली
 •  पोलिसांचा त्याच हॉटेलमधील एका रुमवर छापा व मोहीम फत्ते

नागोरी ‘डील’साठी कोल्हापुरात?
ऐन निवडणुकीत नागोरीचा कोल्हापुरात वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एखादे ‘डील’ करण्यासाठीच तो शहरात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. शाहूपुरी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर लगेचच त्याला शहापूर पोलिसांनी तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली. दरम्यान, नागोरीचा ताबा मिळावा, यासाठी मुंबई एटीएससह सातारा व कोल्हापूर एलसीबी सोमवारी (ता. ८) न्यायालयात अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Pistol smuggler Manish Nagori arrested in Kolhapur