सोलापूर सिद्धेश्‍वर यात्रा; धार्मिक विधींना रविवारपासून प्रारंभ 

solapur
solapur

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधींना रविवार 14 जानेवारीपासून सुरवात होत आहे. यंदा सिद्धेश्‍वर यात्रेत जवळपास 250 स्टॉल उभारण्यात येत असून भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना सुविधा देण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील असल्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्‍वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, गुरुभेट व सोन्नलगी सिद्धेश्‍वर मंदिराला तसेच सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या ठिकाणीही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून 14 जानेवारी होणाऱ्या अक्षता सोहळ्याचे धावते वर्णन ऐकविण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस अॅड. मिलिंद थोबडे, रामकृष्ण नष्टे, बाळासाहेब भोगडे, मल्लिनाथ जोडभावी, सिद्धेश्‍वर बमणी, गुंडप्पा कारभारी, आर. एस. पाटील, महेश आंदेली आदी उपस्थित होते. 

पालखी व नंदीध्वजाच्या मिरवणुका 
यात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघेल. सिद्धेश्‍वरांच्या पालखीची मिरवणूक 13 ते 17 जानेवारी या कालावधीत निघेल. 13 जानेवारीला सकाळी आठ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठातून मिरवणुकीला सुरवात होईल. ती ठरलेल्या मार्गाने सिद्धेश्‍वर मंदिरात जाईल. तेथून एक वाजता काठ्यांची मिरवणूक निघेल. 68 लिंगांना तैलाभिषेक करून प्रदक्षिणा घालून रात्री आठ वाजता हिरेहब्बू मठात परत येईल. 

संस्कार भारतीची रांगोळी 
संस्कार भारती व कला फाउंडेशनच्या वतीने यंदाही मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. कसबा पेठेतील हिरेहब्बू मठापासून ते सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यापर्यंत पायघड्या असतील. गेल्या १९ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.

डिस्ने लॅण्ड यात्रेचे आकर्षण 
भारताच्या विविध भागातील विक्रेते सिद्धेश्‍वर यात्रेत स्टॉल उभारणार आहेत. स्टॉलची संख्या जवळपास २५० असेल. गृहोपयोगी वस्तूंचे दुकाने, हस्तकला, ज्वेलर्स यासह खाद्यपदार्थांची दुकाने, आकाशपाळणे, मौत का कुआ, लोखंडी ब्रेक डान्स, गाढवाची कसरत, मॅजिक शो, सेल बो, मिनी रेल, ड्रॅगन ट्रेन, हसी घर, डॉग शो, एअर इंडिया, टोराटोरा यासह अनेक करमणुकीचे साधने यात्रेत असतील. डिस्ने लॅण्ड हे यंदाच्या यात्रेचे आकर्षण आहे. 

कृषी प्रदर्शन 
यात्रेच्या निमित्ताने गेल्या ४49 वर्षांपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन होम मैदानावर केले जात आहे. यंदा 16 ते 20  जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शन भरविले जाणार आहे. प्रदर्शनात 80 स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे 
यात्रेच्या परिसरात 40 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी देवस्थान समिती सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यात्रेतील धार्मिक कार्यक्रम  
- रविवार, 13 जानेवारी : यण्णीमज्जन : 68 लिंगांना तैलाभिषेक 
- सोमवार, 14 जानेवारी : सम्मतिभोगी : संमती कट्ट्यावर अक्षता समारंभ 
- मंगळवार, 15 जानेवारी : मकरसंक्रांत : होमप्रदीपन समारंभ 
- बुधवार, 16 जानेवारी : किंक्रांत : होम मैदानावर शोभेचे दारूकाम 
- गुरुवार, 17 जानेवारी : कप्पडकळ्ळी : नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन 

गेल्या अनेक वर्षांपासून सिध्देश्वर मंदीरात ध्यानमंदिर बांधण्याचा मानस होता. त्याचे काम चालू असून श्री सिध्देश्वर महाराज मूर्तीसमोर तळघरात 2500 स्व्केअर फुट क्षेत्रफळाचा आणि 12 फूट उंचीचे ध्यानमंदिर बांधण्यात आले आहे. या ध्यान मंदीरात सुमारे 400 भाविक ध्यान धारणा करु शकतील. पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होईल.
- धर्मराज काडादी, 
अध्यक्ष, श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com