सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा आराखडा तयार

तात्या लांडगे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा सोलापूर-उस्मानाबाद अशा 84 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे अंतिम टप्प्यात आला असून आता आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

सोलापूर : पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा सोलापूर-उस्मानाबाद अशा 84 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे अंतिम टप्प्यात आला असून आता आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या मार्गावर 10 रेल्वे स्थानके असून त्यासाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. संपादित होणाऱ्या जमिनीचा सर्व्हेही पूर्ण करण्यात आला असून डिसेंबरपासून संपादनाची कार्यवाही सुरू होईल, असेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या 2018-19 च्या योजनेत सोलापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मुंबईत या रेल्वे मार्गाच्या कामाची सुरवात झाली. त्यानुसार मुंबईतील रेल इंडिया टेक्‍निकल इकॉनॉमिक सर्व्हिसेस कंपनीतर्फे सर्व्हे करण्यात आला. रेल्वे मार्गासाठी लागणारी जमिनी, स्थानकांवरील सोयी-सुविधा, भुयारी मार्ग, फ्लाय ओव्हर याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करणार असून जानेवारी 2020 पासून रेल्वे मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होईल, असा विश्‍वास साईड इन्चार्ज संदीपकुमार मौर्य यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

ठळक बाबी...
- सोलापूर, खेड, मार्डी, तामलवाडी, माळुंब्रा, रायखेल, वडगाव, तुळजापूर,
सांजा, उस्मानाबाद अशी असणार स्थानके
- 84 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित
- 10 टप्प्यातील सर्व्हे पूर्ण : तीन- तीन किलोमीटरवरील मार्किंग करण्याचे काम सुरू
- सोलापूर व उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांमार्फत डिसेंबरपासून संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची जाणार नोटीस
- 2022 पर्यंत या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : पश्‍चिम
महाराष्ट्र व मराठवाड्यातील व्यापारास मिळणार चालना
- भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी सहा कोटींचा निधी प्राप्त : संपादित
जमिनीसाठी आणखी निधीची मागणी

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या रेल इंडिया टेक्‍निकल इकॉनॉमिक सर्व्हिसेस, मुंबईच्या माध्यमातून सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ड्रॉईंग बनवण्याचे काम सुरू असून काही दिवसांत त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयास सादर केला जाईल. दीड- दोन महिन्यात भूसंपादनाची कार्यवाही सुरू होईल.
- संदीपकुमार मौर्य, साईड इन्चार्ज, सोलापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्ग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plan for solapur osmanabad railway is ready