प्लास्टिक बंदीला स्मार्ट सोलापूरकरांचा ठेंगा 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

सोलापूर : सहा महिन्यांपूर्वी राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू झाली. जनजागृतीनंतर हळूहळू प्लास्टिकच्या जागी कापडी पिशव्या दिसू लागल्या. मात्र, सोलापूरकरांनी सध्या प्लास्टिक बंदीला ठेंगा दाखवल्याचे दिसून आले आहे. महापालिकेची त्रोटक यंत्रणा, हे एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सोलापूर : सहा महिन्यांपूर्वी राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू झाली. जनजागृतीनंतर हळूहळू प्लास्टिकच्या जागी कापडी पिशव्या दिसू लागल्या. मात्र, सोलापूरकरांनी सध्या प्लास्टिक बंदीला ठेंगा दाखवल्याचे दिसून आले आहे. महापालिकेची त्रोटक यंत्रणा, हे एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

चित्रपटगृह, मॉल, मोठमोठ्या शो-रूम आणि कपड्यांच्या दुकानांत बंदी पाळली जात असली, तरीही घाऊक बाजार, किराणा मालाचे दुकान आणि रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी आजही प्लास्टिक पिशव्या सरसकट वापरल्या जात आहेत. साहजिकच प्लास्टिक बंदी खरेच लागू झाली आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विशेषतः मटण विक्रेते आणि मासळी बाजारामध्ये तसेच किरकोळ खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांत छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. 

रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले, फळ-भाजीविक्रेते आणि रुग्णालयाजवळील नारळपाणीवाले ग्राहकांना सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या देत आहेत. प्लास्टिकच्या स्ट्रॉवरही बंदी आहे; परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे. नारळपाणी घेऊन जाण्यासाठी पिशव्याही दिल्या जात आहेत. भाजीविक्रेतेही ग्राहकांना सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या देत आहेत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी अधिक वेगाने सुरू आहे. कारवाई सुरू आहे, मात्र जप्त केल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाणही वाढत आहे. 

कर्नाटकातून येते प्लास्टिक 
महाराष्ट्रातील प्लास्टिक उत्पादनाचे सर्व कारखाने बंद आहेत. त्यामुळे सोलापूर शहरात कर्नाटकातील कलबुर्गीतून प्लास्टिक येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः बाजारपेठांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या कापडी पिशव्यांतून विकल्या जात असताना दिसून येते. 

स्वच्छ भारत अभियान सुरू असल्याने सध्या कारवाई मंदावली आहे. एक फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा जोरात मोहीम राबविण्यात येणार आहे. भाजी विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास जागेवर 300 रुपये दंडाचा प्रस्ताव आहे. 
- अनिरुद्ध आराध्ये, परवाना अधीक्षक 

Web Title: plastic ban not successful in solapur