सोलापुरात 1347 किलो प्लॅस्टिक जप्त 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 18 जुलै 2018

पर्यावरण मंत्र्यांशी आज संवाद 
प्लॅस्टिक मोहिमेसंदर्भात आज पर्यावरणमंत्री रामदास कदम व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्तांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मुख्य लेखापरीक्षक तथा प्रभारी उपायुक्त अजयसिंह पवार यांनी दिली.

सोलापूर : प्लॅस्टिक बंदी मोहिमेंतर्गत आतापर्यंत शहरातील 98 व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार लाख 90 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 हजार 347 किलो प्लॅस्टिकही जप्त केले आहे. 

राज्य शासनाने प्लॅस्टिकवर बंदी आणून कारवाईचे आदेश दिले होते. याची अंमलबजावणी 23 जूनपासून सुरू झाली. त्यानंतर महापालिकेच्या अन्न परवाना विभागाकडून तसेच विशेष पथकाकडून शहरातील विविध ठिकाणी छापा टाकून प्लॅस्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शहरातील 98 व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे चार लाख 90 हजारांचा दंड वसूल केला. 

तीन महिन्यांपूर्वी शासनाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर बंदी घातल्यानंतर त्यावेळीही महापालिकेच्या अन्न परवाना विभागाकडून शहरात विविध ठिकाणी छापा घालून कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी दोन हजार 800 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. या पिशव्यांचा वापर शहरातील अथर्व गार्डन ते चाटला साडी सेंटरपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी करण्यात आला होता. आताही जप्त प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर शहरात होणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीवर सर्वसामान्य नागरिकांकडून ओरड व व्यापाऱ्यांकडून उठाव झाल्यानंतर शासनाने दुसरे परिपत्रक काढून पॅकिंग होणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. तसेच किराणा दुकान आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनाही तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शहरात महापालिकेला अधिकार दिल्यानंतर प्लॅस्टिकवर म्हणावी तशी कारवाई होत नसल्याची ओरड होत असल्याने आता महापालिकेकडून अन्न परवाना विभागातील विविध 10 पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे. 

पर्यावरण मंत्र्यांशी आज संवाद 
प्लॅस्टिक मोहिमेसंदर्भात आज पर्यावरणमंत्री रामदास कदम व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्तांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मुख्य लेखापरीक्षक तथा प्रभारी उपायुक्त अजयसिंह पवार यांनी दिली. 

Web Title: plastic seized in Solapur