खेळाडूंनी नवोदितांपूढे आदर्श ठेवावा : संजय भागवत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

सातारामधील शानभाग विद्यालयाच्या मैदानावर 65 व्या 19 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस प्रारंभ झाला आहे.

सातारा ः राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सातारामध्ये आले आहेत त्याचा आनंद होत आहे. खेळाडूंनी जिद्दीने खेळ करुन नवोदितांपूढे आदर्श ठेवावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि के.एस.डी.शानभाग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शानभाग विद्यालयाच्या मैदानावर 65 व्या 19 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आणि हॉकीचे ऑलिंपिक खेळाडू अजित लाकरा यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी भागवत बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, के.एस.डी.शानबाग विद्यालयाच्या संचालिका आँचल घोरपडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या प्राप्त प्राची थत्ते, प्राचार्या श्रीमती गायकवाड, तालुका क्रीडाधिकारी बळवंत बाबर, आर.वाय.जाधव, यशवंत गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक महेश खुटाळे, सागर कारंडे, अभिजीत मगर व निवड समिती सदस्य उदय पवार,आरती हळंगीळी व हॉकी संघटनेचे पदाधिकारी आणि संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

भागवत यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. ऑलिंपीक खेळाडू अजित लाकरा यांनी राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र माने यांनी सूत्रसंचलन केले. महेश खुटाळे यांनी आभार मानले.

या स्पर्धेत राज्यातील नऊ विभागातील मुलांचे आणि मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा सकाळच्या व सायंकाळच्या सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Players Should Set A Model For Newcomers Says Sanjay Bhagwat