जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता... 

विनायक लांडे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्रशासनास प्राप्त झाला आहे. तहसील पातळीवर हा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण तत्काळ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिली.

नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्रशासनास प्राप्त झाला आहे. तहसील पातळीवर हा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण तत्काळ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिली.

तालुकास्तरावर वाटप 

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला होता.  मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून चार लाख 54 हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख 36 हजार 146 आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल विभागीय आयुक्तांतर्फे शासनदरबारी दाखल झाला होता. आता नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 135 कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान नुकतेच जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहे. या मदतीचे वाटप तत्काळ तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. 

टॅंकरनेही मोडला होता विक्रम 

गेल्या वर्षी जिल्ह्याने दुष्काळ सोसला. पशुधन जगविण्यासाठी 504 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या टॅंकरच्या संख्येने 873 इतका विक्रमी आकडा गाठला. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीला शिवाराचे डोळे मॉन्सूनच्या आगमनावर लागले होते. सुरवातीची काही नक्षत्रे बरसल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस चित्रा व स्वाती नक्षत्राच्या सरींनी शिवारात बरसातीचा उत्सव मांडला. 

परतीचा पाऊस दमदार 

97 पैकी 97 महसूल मंडळांत दमदार पाऊस झाला. परतीच्या मॉन्सूनने यंदा 809.99 मिलिमीटर पावसाने मागील 18 वर्षांच्या सरासरीचा विक्रम मोडला. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात 200 मिलिमीटर उच्चांकी पाऊस झाला. पावसाने खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पावसामुळे घटलेला जलस्तर वाढला आहे. मात्र, बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे फड उद्‌ध्वस्त केले. 

पहिल्या टप्प्याचे अनुदान 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्य शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार 135 कोटी 55 लाख पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले आहे. तहसील पातळीवरून लवकरच हे अनुदान वितरित केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

अतिवृष्टीचा फटका 

1,583 गावे 
4,54,000 हेक्‍टरचे पंचनामे पूर्ण 
6,36,146 शेतकरी 

2,16,587 हेक्‍टर जिरायती 
2,00,087 हजार शेतकरी 

2,21,198 हेक्‍टर बागायती 
3,24,521 शेतकरी 

16,226 हेक्‍टर फळबागा 
23,679 शेतकरी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pleasant talks for farmers in the district ...