बाजरी, सोयाबीनची जनावरांना विषबाधा  

दौलत झावरे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतात सडलेली बाजरी आणि सोयाबीन खाण्यायोग्य राहिले नाही.

नगर ः अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतात सडलेली बाजरी आणि सोयाबीन खाण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे शेतकरी बाजरी, सोयाबीन जनावरांना घालण्याची शक्‍यता आहे. परंतु त्यामुळे जनावरांनाही विषबाधा होण्याची शक्‍यता पशुसंवर्धन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात (सप्टेंबर व ऑक्‍टोबर) झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी, सोयाबीन, मका, भुईमूग, रब्बी ज्वारी, कापूस, कांदा आदी पिकांबरोबर फळबागांचेही मोठे नुकसान झाले. संततधार पावसाने शेतातील बाजरी व सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. 

शेतात भिजलेली बाजरी आणि सोयाबीन खाण्यायोग्य नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फेकून दिले. पण काही शेतकऱ्यांकडून भिजलेली बाजरी आणि सोयाबीन जनावरांना घालण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 
दरम्यान, बाजरी खाल्ल्याने देहरे (ता. नगर) येथील सुमारे अकरा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार काल समोर आला. संबंधितांच्या खाण्यात भिजलेली बुरशीजन्य बाजरी खाण्यात आल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच देहरेतील अकरा जणांना विषबाधा झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

या भिजलेल्या बुरशीजन्य बाजरीमुळे जनावरांनाही विषबाधा होऊ शकते. भिजलेली बाजरी व सोयाबीन माणसांना अथवा जनावरांना खाऊ घालणे धोकादायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भिजलेली बाजरी व सोयाबीन पूर्णपणे वाळल्याशिवाय जनावरांना खाऊ घालू नये, तसेच वाळल्यानंतर खाऊ घालण्याचे प्रमाण अल्प ठेवणे आवश्‍यक आहे. जास्त बाजरी जर जनावरांच्या खाण्यात आली तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

पावसात भिजलेली बाजरी व सोयाबीन काळे पडलेले असल्याने ते जनावरांना खाऊ घालू नये. स्वच्छ धुऊन कडक उन्हात वाळवावे. त्यानंतर चुन्याच्या निवळीची त्यावर फवारणी करावी. पुन्हा वाळल्यानंतर जनावरांना अल्प प्रमाणात खाऊ घालावे. जास्त खाल्ल्यास जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. 
- डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद 

जनजागृती मोहिम पशुसंवर्धन राबविणार 

पावसाळ्याच्या सुरवातीला उगवलेल्या नवीन गवतामध्ये नायट्रेटचे प्रमाण सर्वाधिक असते. ते गवत खाल्ल्याने यंदा जिल्ह्यात चाळीस जनावरांचा मृत्यू झाला. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाने जनजागृती मोहिम हाती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे शेतकऱ्यांचा नायट्रेड गवताबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे जिल्ह्यात जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी झाले. बाजरी, सोयाबीनबाबतही पशुसंवर्धन विभाग जनजागृती मोहिम हाती घेणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 

बाजरी उन्हाळ वाळवूनच खा 
बाजरी खाताना प्रत्येकाने खबरादारी म्हणून उन्हात वाळवून बाजरी खाणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poisoning of millet, beans animals