महाराष्ट्राची लोकसंस्कृती पाहून पोलंडवासीय थक्क

महाराष्ट्राची लोकसंस्कृती पाहून पोलंडवासीय थक्क

कोल्हापूर - महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा ठसका पाहून एकोणतीस पोलंडवासीय थक्क झाले. सह्याद्री प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी सादर केलेला शिवकालीन युद्धकलेचा थरार पोलंडवासीयांची दाद घेणारा, तर ‘लेणं महाराष्ट्राचं’मधून मराठमोळ्या संस्कृतीचे रंग उलगडले, तसतसे उपस्थितांच्या शरीरावर रोमांच उभारले. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या पुढाकारातून तुळजाभवानी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

शाहीर आझाद नायकवडी यांच्या पथकाने पोलंडवासीयांना भारावून सोडले. गण सादर करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. ‘सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला’, या गीतावर गजनृत्य सादर केल्यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’, हे गीत सादर झाले. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेषात आलेल्या कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.

त्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे हलगी, घुमकं, कैताळाच्या कडकडाटावर युद्धकलेस प्रारंभ होताच, पोलंडवासीयांचे मोबाईल त्यांच्याकडे वळले. लाठी, पट्टा, फरी गदका, दुहाती लाठी, लाठी व फरी गदका लढत, विटा, लिंबू काढणी, या प्रकारांच्या सादरीकरणाने पोलंडवासीय अचंबित झाले. पट्ट्याच्या साह्याने लिंबू कापल्यानंतर त्यांनी टाळ्यांची दाद दिली. ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीसह शस्त्रांची माहिती दिली. अक्षय पाटील, राजेंद्र काटकर, चेतन बिरंजे, रोहन भोगले, प्रवीण केंबळे, योगेश वेटाळे, सागर पाटील, रोहिणी वाघ, सायली बिरंजे, मेघा माळी, विशाखा पाटील यांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. 

युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनंतर पुन्हा ओवी-भूपाळी-वासुदेव व शेतकरी नृत्याने फेर धरला. शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराज यांची शाहिरीतून महती स्पष्ट करण्यात आली. खास कोल्हापुरी बाण्याची खासीयत सांगणारा कोल्हापूरचा पोवाडा सादर झाला. गोंधळ मांडीला अंबे गोंधळाला यावं, या गीतावर सादर झालेले गोंधळ नृत्य दाद घेणारे ठरले. आझाद नायकवडी, मनीषा नायकवडी, रूपा शारबिद्रे यांनी गीतांचे सादरीकरण केले. ओंकार सुतार (सिंथेसायझर), गणेश औंधकर (हार्मोनियम), विक्रम परीट (ढोलकी), मनोज जोशी (पॅड) यांनी संगीतसाथ दिली. फिजा खान, आरती कांबळे, अरुण शिंदे, युवराज पुजारी, पापालाल नायकवडी, स्वराज नायकवडी यांनी कोरस दिला.

ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी युद्धकलेची माहिती दिली. यौवराज शहाजीराजे छत्रपती, यशस्विनीराजे, यशराजे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वेदांतिका माने आदी उपस्थित होते. फत्तेसिंह सावंत, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, धनाजी खोत, माहिती प्रसारण खात्याचे अंकुश चव्हाण, हंसराज राऊत, अजय कोराणे, शाहीर शहाजी माळी यांनी संयोजन केले. प्रा. प्रमोद पाटील व मनाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com