कोल्हापूर आहे तरी कसे पाहण्यासाठी आले पोलंडचे विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

कोल्हापूर - कोल्हापूरबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व कोल्हापूर आहे तरी कसे, हे पाहण्यासाठी आज पोलंडचे वीस विद्यार्थी कोल्हापुरात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडवासीय कोल्हापुरात निर्वासित म्हणून आश्रयाला आले होते. जवळ जवळ चार वर्षे त्यांचे वास्तव्य त्यांच्यासाठी वळिवडे (ता. करवीर) येथे बांधलेलेल्या खास वसाहतीत होते

कोल्हापूर - कोल्हापूरबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व कोल्हापूर आहे तरी कसे, हे पाहण्यासाठी आज पोलंडचे वीस विद्यार्थी कोल्हापुरात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडवासीय कोल्हापुरात निर्वासित म्हणून आश्रयाला आले होते. जवळ जवळ चार वर्षे त्यांचे वास्तव्य त्यांच्यासाठी वळिवडे (ता. करवीर) येथे बांधलेलेल्या खास वसाहतीत होते. त्या काळात कोल्हापूरकरांनी दिलेल्या आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोलंडची नवी पिढी आज कोल्हापुरात आली. दोन दिवस त्यांचे कोल्हापुरात वास्तव्य असणार आहे. 

आज सकाळी दहा वाजता या विद्यार्थ्यांनी संगम टॉकीजच्या पिछाडीस असलेल्या ख्रिश्‍चन दफनभूमीस भेट दिली. तेथे त्यांच्या पूर्वजांच्या असलेल्या स्मृतीस्थळास त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलंडवासीयांचे कोल्हापुरात वास्तव्य असताना त्यातील 85 जणांचा वृद्धत्व आजारपण या कारणाने येथे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा दफनविधी या दफनभूमीत झाला होता. यावेळी या विद्यार्थ्यांनी शांती प्रार्थना म्हटली. 

त्यानंतर या विद्यार्थ्यांनी नवीन राजवाड्याला भेट दिली. श्रीमंत शाहू छत्रपती यांनी त्यांचे स्वागत केले. राजवाड्याचे दर्शन घडवले व या विद्यार्थ्यांशी त्यांनी भारत, पोलंड, शैक्षणिक, सांस्कृतिक देवाण-घेवाणीची चर्चा केली. नवीन राजवाडा, तेथील आदरातिथ्य पाहून हे विद्यार्थी भारावून गेले.

दुपारी या विद्यार्थ्यांनी गांधीनगरला (वळिवडे) भेट दिली. तेथे ज्या ठिकाणी पोलंडवासीय राहात होते, त्या जागेची पाहणी केली. तेथे आता जुन्या बराकीचे फार मोठे अस्तित्व नाही. नवीन इमारती उभ्या राहिल्या आहेत, तरीही या मातीत आपले देशवासीय सुखरूप राहिले होते, या भावनेने या विद्यार्थ्यांनी त्या जागेचे दर्शन घेतले. या सर्व विद्यार्थ्यांसोबत पोलंडचे भारतातील मैत्री प्रतिनिधी कर्नल विजयसिंह गायकवाड होते. त्यांनी या विद्यार्थ्यांना सर्व स्थलांची माहिती दिली. उद्या हे विद्यार्थी अंबाबाई मंदिर, शिवाजी विद्यापीठ येथे भेटी देणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poland students visit to Kolhapur special story