कोल्हापूर येथे मटका बंद... मटकावालेही कोठडीत बंद

सुधाकर काशीद
बुधवार, 17 जुलै 2019

कोल्हापुरातील मटका कोल्हापूरपुरता मर्यादित नव्हता. निपाणी, बेळगाव, सांगली, मिरज, इचलकरंजीपर्यंत याची पाळेमुळे पसरली होती. मटक्‍याच्या या पैशावर काहींनी जमिनी, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात संस्थानच निर्माण केले होते. पोलिस मटका बंद करू शकणारच नाहीत, अशा रुबाबात ते होते. परंतु, पोलिसांनी ठरवले तर ते काय करू शकतात, याचा वेध घेणारी मालिका.

कोल्हापूर - ‘कोल्हापुरातला मटका कोणीच बंद करू शकत नाही. मटकेवाल्यांनी हप्ता देऊन पोलिसांना गुंडाळलेले आहे.’ ‘मटक्‍याच्या प्रमुख मालकाला पकडायचा पोलिसांचा घास नाही...’ अशी उघड चर्चा कोल्हापुरात मटकेवाला आणि पोलिस यांच्या संबंधांमुळे होत होती. बऱ्याच अंशी त्यात तथ्य वाटावे अशी स्थिती होती. मटकेवाल्याला अटक झाली, की तो तासाभरात पुन्हा रुबाबात बाहेर... ही परिस्थिती कोल्हापूरची जनता अनेकवेळा पाहत होती. हप्त्यांमुळे पोलिस मटकेवाल्यांवर काही कारवाई करणार नाहीत, ही समजूत त्यामुळेच रूढ झाली होती; पण पोलिसांनी खरोखर मनात आणले, तर ते काय करू शकतात याची प्रचीती पहिल्यांदाच कोल्हापूरकरांना आली आहे. केवळ कोल्हापूरचाच मटका काय, तर मुंबईतील सावलाचा मटकाही पोलिसांनी बंद पाडला आहे. मटका बंद करण्याचा हा कोल्हापूर पोलिसांचा फॉर्म्युला राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे. 

केवळ मटकाच नव्हे तर मटक्‍याच्या आकड्याची छपाई (शुभांक) करणाऱ्या मुंबईतील प्रिंटिंग प्रेसलाही कोल्हापूर पोलिसांनी काल (ता. १५)  टाळे ठोकले आहे आणि मटका काढण्याची पद्धतच बनावट, बोगस आणि हजारो कुटुंबांची धूळधाण करणारी असल्याचे चित्र समोर आणले आहे. उदाहरणच सांगायचे झाले तर कोल्हापुरात अमुक एका अड्ड्यावर आज जादा पैसे (लोड) लागले आहेत याची माहिती घेऊन तो आकडा येणार नाही, याची खबरदारी मटकेवाले कसे घेतात, मग ज्या आकड्यावर जास्त पैसे लागले आहेत, तो 
आकडा बाजूला कसा करतात इथपर्यंत पोलिस पोचले आहेत. मटका लागेल या आशेवर रोज मटका खेळणाऱ्याचा खिसा कसा रिकामा व मटका बुक्कीवाले मात्र रोज कसे मालामाल याचे बारकोडही पोलिसांनी मिळवले आहेत. 

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा, शहर पोलिस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे या टीमने केलेल्या कारवाईचा हा सारा परिणाम आहे. या कारवाईमुळे मटका बंद झाला आहे; पण त्याहीपेक्षा मनात आणलं, तर पोलिस कारभाऱ्यांनाही मोका लावू शकतात. केवळ मटका घेणाऱ्या पंटरला न पकडता, मटक्‍याची पाळेमुळे खणून काढू शकतात, हे लोकांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे बदनाम झालेल्या पोलिस यंत्रणेचा चेहरा सुधारण्यास त्यामुळे मदत झाली आहे.

मटका चालवण्याचा मुख्य आरोप असलेला पप्पू सावला अद्याप फरारी आहे; पण त्याचा मुलगा विरल, मटक्‍याची यंत्रणा हलवण्याचा आरोप असलेले जयेश शहा, शैलेश मणेर, जितेंद्र गोसालिया मोका कारवाईखाली अटकेत आहेत. सलिम मुल्ला हा कोल्हापुरातील सूत्रधार त्याची बायको माजी उपमहापौर शमा मुल्ला, इचलकरंजीचे आगरवाल बंधू यांच्यासह ४२ जण मोकाखाली अटकेत आहेत. यापूर्वी कारवाई झाली, की तासाभरात रुबाबात पोलिस कोठडीच्या बाहेर येणारे दोन महिने झाले तरी कोठडीत आहेत. मटक्‍याचा सम्राट म्हणवणारा तर पळून खेळत आहे. २४ बाय ७ जुगार अड्डा चालवणारा धंदा बदलण्याच्या नादात आहे. पोलिसांची दहशत किंवा कारवाई काय असते, हे यातून तूर्त तरी दिसले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action on Matka in Kolhapur