#26/11 : पोलिस सज्ज आहेतच; नागरिकांनीही राहावे दक्ष!

परशुराम कोकणे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यास आज होताहेत 11 वर्षे 
- अकरा वर्षात पोलिस दलात बरेच सकारात्मक बदल 
- समुद्रीतटावरील सुरक्षेला दिले प्राध्यान्य 
- इंटरनेटवरही सायबर पोलिसांचा वॉच

सोलापूर : मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यास मंगळवारी 11 वर्षे होत आहेत. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस दलात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. जागोजागी पोलिस दिसण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरक्षेसाठी पोलिस सज्ज आहेतच, नागरिकांनीही दक्ष राहून आपला देश दहशतवादी कारवायांपासून सुरक्षित ठेवावा, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा : ​"अबब... ! सोलापुरात कांदा पोचला 11 हजारांवर​

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
26/11च्या निमित्ताने "सकाळ'ने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दहशतवादी हल्ल्यानंतर शासनाने रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच अधिक सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. शहरातील प्रमुख चौकात खासगी दुकानांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पोलिसांनी विणले आहे. मॉल, चित्रपटगृह, हॉटेलच्या परिसरातही खासगी सुरक्षा रक्षकांसोबतच सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणावर लावत आहेत. बस स्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठा यासह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने मॉकड्रील घेतले जात आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या वतीने दररोज शहरातील मर्मस्थळांना भेटी देऊन तपासणी केली जाते. व्हीआयपी बंदोबस्तावेळी पोलिस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादी प्रतिबंधक कक्षाच्या वतीने शहरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवली जात आहे. पोलिसांच्या प्रशिक्षणातही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे. गुप्त माहिती कशी काढावी याबाबत पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

हेही वाचा : मला तुझ्याशी लग्न करायचे आहे; नाही म्हटल्यावर त्याने तिला...

वेगवेगळ्या पथकांची स्थापना
याच अनुषंगाने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, "26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिस दलात सशास्त्र आणि इंटिलिजन्सच्या पातळीवर बरेच बदल झाले आहेत. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पोलिस दलाने समुद्रीतटावरील सुरक्षेला अधिक प्राध्यान्य दिले. जागोजागी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. वेगवेगळ्या पथकांची स्थापनाही करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवादी विचारांचा प्रचार होऊ नये यासाठीही पोलिस प्रशासन दक्ष आहे. सोशल मीडीयावर सायबर पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून लक्ष देण्यात येत आहे. रस्त्यावर जागोजागी पोलिस दिसण्याचे प्रमाण वाढले आहे.'

हे लक्षात ठेवा..​
- आपल्या परिसरात फिरणाऱ्या संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना द्या. 
- बेवारस बॅग, खेळणी किंवा वाहनाला हात लावू नका. 
- घर भाड्याने देताना त्यांची छायाचित्रे आणि ओळखपत्र घ्या. 
- कोणत्याही प्रकारची माहिती देण्यासाठी 100 या क्रमांकावर संपर्क साधा. 
 
सोलापूरकर म्हणतात...
26/11च्या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस दलात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. सुरक्षेसाठी पोलिस सज्ज आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवादी विचारांचा प्रसार रोखण्यासाठी पोलिस काम करत आहेत. बस, रेल्वेत संशयित बॅग, खेळणी ठेवून घातपाती कारवाया होऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनीही दक्ष असावे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त 

26/11च्या घटनेत सोलापूरचे माजी पोलिस आयुक्त अशोक कामटे हे हुतात्मा झाले होते. त्यांनी केलेले काम आजही सोलापूरकरांच्या स्मरणात आहे. मुंबईतील त्या हल्ल्यानंतर पोलिस दलात अनेक चांगले बदल झाले आहे. पोलिसांनी अधिक सतर्क रहायला हवे. नागरिकांशी संपर्क वाढवणे आवश्‍यक आहे. गल्लीबोळात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची माहिती लोकांकडूनच मिळू शकते. जनतेनेही प्रत्येक घटनेची माहिती पोलिसांना द्यावी. 
- अनिल पोरे, 
निवृत्त सहायक फौजदार 

26/11 सारख्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी पोलिस दलाने दक्ष असावे. सैनिकांप्रमाणे पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र द्यावेत. बुलेट फ्रुफ जॅकेट मिळावेत. मुंबईतील त्या घटनेत माझा मुलगा राहुल शिंदे हुतात्मा झाला होता. त्यानंतर आमच्या सुलतानपूरचे नाव बदलून राहुलनगर करण्यात यावे ही मागणी केली होती, अद्याप त्याबाबत निर्णय झाला नाही. 
- सुभाष शिंदे, 
हुतात्मा राहुल शिंदे यांचे वडील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police are ready; Citizens should also be careful