सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा पाय निकामी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

गणेश गंभीरे या युवकाला बेदम मारहाणीत अंगठ्याचे नख उचकटले असून हे कमी काय म्हणून त्याच्या भावालाही पोलिसांनी चोपले आहे.

सांगली - कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या एका तरुणास सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चौघांनी बेदम मारहाण करीत जायबंदी केले. या तरुणाच्या शरीरावर काठीचे वळ उठले असून उजवा पाय निकामी झाला आहे. बेदम मारहाणीत अंगठ्याचे नख उचकटले असून हे कमी काय म्हणून त्याच्या भावालाही पोलिसांनी चोपले आहे. हे प्रकरण आज सकाळी उघडकीस आल्यानंतर जखमी गणेश दशरथ गंभीरे (वय 22, रा. रामकृष्ण नगर) याच्या नातेवाईकांनी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमा होत गोंधळ घातला. या प्रकारामुळे अवघ्या सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा सांगली पोलिस दलाच्या अमानुष गुन्हेगारी वर्तनाचा धिक्कार होत आहे. 

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणाचे व्रण ताजे असतानाच कुपवाड पोलिसांनी हा प्रताप करून पोलिस दलाचे घिंडवडे काढले आहेत. एखाद्या क्रौर्यपटाला साजेसे कृत्य कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भारत शिंदे व त्याच्या साथीदारांनी केले आहे. कोथळे प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सर्वपक्षीय कृती समितीने यावेळीही आक्रमक भूमिका घेत दोषी पोलिसांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी उपाधीक्षक धीरज पाटील यांना निवेदन दिले आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, गणेश गंभीरे याचा भाऊ सुहास मंगळवारी दत्तनगर परिसरातील नागराज खानावळीत जेवणासाठी गेला होता. त्यावेळी जेवणाचे बील देण्यावरुन वादावादी झाली. सुहास याने गणेशला बोलावून घेतले. त्यानंतर खानावळ चालक आणि गंभीरे यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर दोघेही भाऊ तक्रार देण्यासाठी कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक भारत शिंदे यांनी गणेशलाच पोलीस ठाण्यात बसवून घेतले. त्याची तक्रार न घेता "तु गुन्हेगार आहेस' असे म्हणत शिंदे यांच्यासह चौघा पोलिसांनी दोघांना काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतरही दिवसभर पोलिस ठाण्यातच बसवून ठेवले. रात्री उशिरा त्याला घरी पाठवण्यात आले. पोलिसांच्या मारहाणीत गणेश गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांनी काल मध्यरात्री तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीत गणेशच्या पायाचे हाड मोडले असून शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे व्रण उठले आहे. आज सकाळी हा प्रकार सोशल मिडियावरून व्हायरल झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी सिव्हिल रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यानतंर जिल्ह्याभरात पोलिस दलाच्या या अमानुष कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
आज सकाळी सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यर्त्यांनीही गंभीर कुटुबियांकडून हकिकत ऐकून घेतली. तक्रारदारास इतक्‍या अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिंदेंसह अन्य पोलिसांवर करवाईसाठी तातडीने उपअधीक्षक पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी सखोल चौकशी करुन, योग्य ती कारवाई केली जाईल, असे अश्‍वासन त्यांनी समितीला दिले. समितीचे सतीश साखळकर, आसिफ बावा, महेश खराडे, अमर पडळकर, अशरफ वांकर, जमीर रंगरेज यांच्यासह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

'गणेश गंभीरे याच्यावर यापूर्वीही काही गंभीर गुन्हे दाखल आहे. या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली जाईल. त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. त्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकाराचा शोध घेऊ. दोषींवर कारवाई केली जाईल.' असे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील सांगितले आहे. 

"तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तक्रार न घेता बेदम मारहाण करण्यात आली. उलट आमच्यावरच गुन्हा दाखल केला. दिवसभर मारहाण करून रात्री सोडताना तक्रार केली तर बघून घेतो असा दम दिला. मरणासन्न अवस्थेत भाऊ पडल्यावर आमची तक्रार नोंदवून घरी सोडण्यात आले.''  अशी तक्रार जखमी गणेशचा भाऊ सुहास गंभीरे याने केली आहे. 

प्रभारी 'कारभार' 
अनिकेत कोथळे प्रकरणात शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रजेवर होते. त्या कालावधीतच हा प्रकार घडला. या प्रकरणातही कुपवाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम रजेवर आहे. त्यांच्या जागेवर प्रभारी कार्यभार सहायक निरीक्षक भारत शिंदे पाहत होते. त्यांनी वरिष्ठ अधिकारी रजेवर असतानाच कायदा हातात घेत ज्या बेदमपणे तक्रारदारास मारहाण केली त्यावरुन पुन्हा एकदा खाकी वर्दीतील गुन्हेगारीचे दर्शन घडवले आहे. 

Web Title: police beaten youth in sangali