पोलिसांवरच दादागिरी का?

- लुमाकांत नलवडे
गुरुवार, 2 मार्च 2017

कोल्हापूर - नियम मोडायचे आणि कारवाई होताना पुन्हा दादागिरी करायची, हे कोणते कायद्याचे राज्य? येथे पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यापर्यंत लोकांची मजल जातेच कशी? पोलिसांचा धाक कमी झाला आहे की वाहनधारकांची दादागिरी वाढली आहे? पोलिस चुकीचे आहेत की वाहनधारक? नक्कीच ही धोक्‍याची घंटा आहे. एखाद्या पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्यावरच  यावर उपाय शोधला, तर ते उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागणार आहे. 

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक मोहीम घेतली. एकीकडे वाहतुकीला शिस्त लागली पाहिजे म्हणायचे आणि दुसरीकडे पोलिसांनाच दमदाटी करायची, असाच काहीसा प्रकार शहरात सुरू झाला आहे. तरुणांचे करिअर पाहून पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येते; पण त्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरातील बेशिस्तीला लगाम घालणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना वारंवार वाहनचालकांच्या दमदाटीला सामोरे जावे लागत आहे. 

महिन्यापूर्वी उमा चित्रपट गृहाशेजारीच दमदाटी, धक्काबुक्कीपर्यंत गंभीर घटना घडली. दोन दिवसांपूर्वी राजारामपुरी जनता बझार चौकात तिबल सीट जाणाऱ्या तरुणांवर कारवाई करताना पोलिसाला बघून घेण्याची धमकी दिली. मंगळवारी दुपारी बिंदू चौकात एकेरी मार्गाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करताना मद्यधुंद तरुणांनी पोलिस रोहित खाडे यांना दमदाटी केली. त्यामुळे आता पुढे कोण? असाच प्रश्‍न खुद्द पोलिसांनाच पडला आहे. हे असेच होत राहिले तर एक दिवस एखाद्या पोलिसाच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पोलिसांचा धाक कमी झाला आहे, तरुणांची दादागिरी वाढली आहे, नेत्यांचे अभय वाढले आहे, अशी अनेक कारणे या मागे आहेत. काही वेळा पोलिसांकडून मिळणारी वागणूकही त्याला कारणीभूत आहे. घटनेनंतर पोलिस शांत राहतात. हा त्यांचा ‘संयम’ की भित्रेपणा, यावरही चिंतन आवश्‍यक आहे. 

होऊ दे दूध का दूध...
‘सेफ सिटी’च्या उपक्रमातून शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क उभारण्यात आले आहे. याच्या आधारे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई होणे अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घातली जाते त्याचे फुटेज मिळवून संबंधितांवर जबर कारवाई झाली पाहिजे. याच पद्धतीने वाहतूक पोलिसांकडून सर्वसामान्य वाहनधारकांना मिळणारी वागणूकही पाहिली पाहिजे. यातून दमदाटीच्या  घटना का घडतात, हेसुद्धा स्पष्ट होईल.

Web Title: The police bullying?