लाच घेण्यापूर्वीच केली शंभरच्या नोटांची मागणी !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

बाळासाहेब भिकाजी बाबर असे लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. हिंगणी येथील दतात्रय बेडगे यांच्या मलीकबाबा कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठविण्याचा होता, त्यासाठी कृषी अधिकारी बाबर याने बेडगे यांच्याकडे अडीच हजारांची लाच मागितली होती.

सोलापूर - जिल्हा परिषदेकडे कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी अडीच हजाराची लाच घेताना मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. लाच घेण्यापूर्वी अधिकाऱ्याने फक्‍त शंभरच्याच नोटा आणायच्या अशी ताकीद दिली होती.

बाळासाहेब भिकाजी बाबर असे लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. हिंगणी येथील दतात्रय बेडगे यांच्या मलीकबाबा कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठविण्याचा होता, त्यासाठी कृषी अधिकारी बाबर याने बेडगे यांच्याकडे अडीच हजारांची लाच मागितली होती. याबाबत बेडगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार उपअधीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीच्या कृषी विभागात सापळा लावला. बेडगे यांच्याकडून अडीच हजाराची लाच घेताना बेडगे यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने मंगळवारी रात्री पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने कृषी अधिकारी बाबर याने लाच घेण्यासाठी फक्‍त शंभर रुपयांच्याच नोटा आणायच्या अशी ताकीद बेडगे यांना दिली होती. मागणीनुसार बाबर याने शंभर रुपयांच्या पंचवीस नोटा लाच म्हणून स्वीकारल्या.

Web Title: police demanded 100 rupees notes for bribe