कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे मिळाले हजाराे रुपये

रुपेश कदम
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

गोरख जगताप व त्यांचे बंधू दुचाकीवरून घरी परतताना त्यांचे वाटेत पाकीट पडले हाेते. ते पाेलिसांनी शाेधून परत केले.

दहिवडी (जि. सातारा) : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे गहाळ झालेली रक्कम मूळ मालकाला परत देण्यात दहिवडी पोलिसांना यश आले.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
गोरख जगताप (रा. पाचवड) व त्यांचे बंधू दुचाकीवरून 16 नोव्हेंबरला दहिवडीकडून घरी निघाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतरच्या धार्मिक कार्यक्रमासाठी साहित्य घेऊन जाताना दुपारी पाचवड फाटा येथे गेले असता खिशातील पाकीट पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पाकिटात 16 हजार रुपये रक्कम होती. हे पाकीट कुठे पडले हे लक्षात न आल्यामुळे त्यांनी शोधाशोध करण्यास सुरवात केली. पाचवड ते दहिवडी रस्त्यावर शोधाशोध केल्यानंतरही त्यांना पाकीट सापडले नाही. त्यामुळे नंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पाकीट गहाळ झाल्याची तक्रार नोंद केली.
 
सीसीटीव्हीच्या साह्याने शोध

सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रहार राक्षे यांनी तक्रारीची दखल घेऊन माहिती घेण्यास सुरवात केली. ग्रामस्थांकडून माहिती घेतली असता बिजवडी येथे नॅचरल डेअरीसमोर एक स्कॉर्पिओ गाडी पुढे जाऊन परत आली व त्यातील लोकांनी रस्त्यावरील काहीतरी उचलेले कळले. नंतर सीसीटीव्हीच्या साह्याने शोध घेतला असता एकनाथ बाबर (चिलारवाडी, म्हसवड) यांची ती गाडी असल्याचे समजले.

एकनाथ बाबर यांचा प्रामाणिकपणा

चंद्रहार राक्षे यांनी एकनाथ बाबर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी पाकीट सापडले असून, त्यातील रक्कम सुरक्षित असल्याचे सांगितले. काल एकनाथ बाबर यांनी ते पाकीट त्यातील ऐवजासह दहिवडी पोलिस ठाण्यात आणून श्री. राक्षे यांच्याकडे दिली. स्वतः गाडीचालक असल्यामुळे व गाडीसह बाहेर असल्यामुळे पाकीट गाडीत तसेच राहिल्याचे श्री. बाबर यांनी सांगितले. त्यानंतर उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित यांनी पाकीट त्यातील रकमेसह मूळ मालक गोरख जगताप यांना सुपूर्द केले. पोलिसांनी तंत्रज्ञाचा योग्य वापर करून केलेल्या पाठपुराव्यामुळे पाकीट परत मिळविण्यात यश आले. याबद्दल राक्षे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. 

''शिवशाही' चा डाव आम्ही उधळून लावू ; प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया

""दहिवडी पोलिसांनी प्रामाणिकपणे कष्ट घेऊन माझे पैसे परत मिळवून दिले. एकनाथ बाबर यांनी प्रामाणिकपणे रक्कम सुरक्षित ठेवून परत दिल्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे.'' 
- गोरख जगताप, पाचवड (ता. माण)  सातारा सातारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Department Returned Thousands Of Rupees Which Citizen Lost