पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती! 

मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस मुख्यालयात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे. अचानक आलेल्या बदलीच्या टांगती तलवारीमुळे कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे. 

सातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस मुख्यालयात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे. अचानक आलेल्या बदलीच्या टांगती तलवारीमुळे कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे. 

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा पोलिस दलाचा बारकाईने आढावा घेतला. या आढाव्यात चुकीच्या आढळणाऱ्या बाबी तातडीने दुरुस्त करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या संमतीशिवाय चालू असलेली शाहूपुरी पोलिस ठाण्यांतर्गतची वाहतूक शाखा बरखास्त केली. या शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी तैनातीचे आदेश दिले गेले. आता आणखी काही जणांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चांना पोलिस दलात उधाण आले आहे. 

पोलिस दलातील विविध विभागांच्या आढाव्यामध्ये काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती एका ठिकाणी असताना ते प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या विभागात काम करत असल्याचे समोर आले, तसेच काहींना दुसऱ्यांदा त्या विभागात कामाची संधी देण्यात आल्याचेही दिसले. अशा कर्मचाऱ्यांना बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अशा 143 कर्मचाऱ्यांची यादी तयार असल्याचेही काही जण ठामपणे सांगत आहेत. यादी निवडीत लावलेल्या विविध निकषांचीही चर्चा होत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्ती व दुसऱ्यांदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. अनेक जण या ना त्या प्रकारे यादीत आपले नाव नाही ना याची खात्री करण्यासाठी धडपडत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारीही काही बोलण्यास तयार नाहीत. याचा फायदा घेत दुसऱ्याच्या त्रासात आनंद मानणाऱ्या प्रवृत्ती अधिकाऱ्यांच्या कानाला लागून याचा, त्याचा नंबर लावण्याच्या खटपटी करत असल्याचे बोलले जात आहे. 

विचारपूर्वक निर्णयाची अपेक्षा 
अनुभवानुसार पोलिस कर्मचाऱ्यांची त्या- त्या विभागातील पोलिसिंगची कौशल्ये विकसित होत जातात. गुन्हे प्रकटीकरणचा कर्मचारी दप्तरी होण्याला फारसा तयार होत नाही किंवा ट्राफीकच्या कामातील कारकुनीही करायला तयार होत नाही. गोपनीयमध्ये काम करण्याचा अनुभव असणाऱ्यांना त्याच विभागात काम करायला आवडते. आवडीच्या ठिकाणी काम करायला मिळाल्यावर त्यांच्याकडून मिळणाऱ्या आउटपुटमध्येही फरक पडतो. काहींच्या कौटुंबिक अडचणी असतात. त्यामुळे त्यांना ठराविक ठिकाणी नोकरी करायला मिळावी, असे वाटते. त्यामुळे केवळ प्रतिनियुक्ती किंवा दुसऱ्यांदा नेमणूक या निकषावर निर्णय होऊ नये, अशी कर्मचाऱ्यांची मानसिकता आहे. कामात चुका करणाऱ्यांवर पोलिस अधीक्षकांनी जरूर कारवाई करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. 

Web Title: police employee Fear of transfer