पोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

सोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या वयोगटातील मुलांचा यात समावेश आहे. कायद्याने अल्पवयीन मुलांना संरक्षण असल्याने त्यांना अटक केली जात नाही. काही दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवून सोडून दिले जाते, यामुळे बाल गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

घरातून योग्य संस्काराचा अभाव आणि वाईट मित्रांच्या संगतीमुळे अनेक मुले वाममार्गाला लागत आहेत. काही मुले थ्रीलसाठी चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. लहान वयामध्ये मोबाईल किंवा अन्य चैनीच्या वस्तू वापरण्याची आवड निर्माण झाल्याने काही मुले चोरीच्या मार्गाकडे वळत आहेत. दुचाकी चोरी, उघड्या घरातून मोबाईल चोरी करणे यासह अन्य गुन्ह्यांमध्ये या मुलांचा सहभाग वाढत आहे. गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान अशा मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांना बोलावून घ्यावे लागते. अशा मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते. 18 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांचा विधिसंघर्षग्रस्त बालक असा उल्लेख केला जातो. काही समाजामध्ये आई-वडीलच मुलांना चोरी करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. 

पॉकीटमनीसाठी अनेक मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील बहुतांश मुले व्यसनाच्या आहारी गेली आहेत. आपला मुलगा दिवसा किंवा रात्री कोठे आणि कोणासोबत जातो, यावर पालकांनी लक्ष ठेवायला हवे. मुलाला कोणते व्यसन लागले आहे का, हे पाहायला हवे. 
- शैलेश खेडकर, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा 

योग्य संस्काराचा अभाव आणि वाईट मित्रांच्या संगतीमुळे मुले बिघडत आहेत. पालकांचे आणि मुलांचे समुपदेशन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. या मुलांचे वेळीच समुपदेशन केले नाही तर ती आयुष्यभर गुन्हेगारी क्षेत्रात अडकून राहतात. 
- समीर सय्यद, 
सदस्य, जिल्हा तपासनिक समिती (बालगृह)

Web Title: police have headache of juvenile