पोलिसांना हेल्मेटसक्ती विचाराधीन - महादेव तांबडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

कोल्हापूर - सुरक्षेच्या दृष्टीने वाहनचालकांनी हेल्मेट घालणे गरजेचे आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या निदान पोलिसांनी तरी त्याची सुरवात आपल्यापासून केली पाहिजे. त्यासाठी पोलिसांना हेल्मेटसक्ती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन अंमलबजावणी केली जाईल, असे नूतन पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी पदाची सूत्रे घेताना सांगितले. जिल्ह्यातील अवैध धंदे, गुंडगिरीसह सायबर क्राइमवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नूतन पोलिस अधीक्षक श्री. तांबडे यांनी आज मावळते पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. तांबडे म्हणाले, 'दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्याच पटीने अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालविताना प्रत्येकाने हेल्मेट वापरले पाहिजे. पोलिस कायद्याची अंमलबजावणी करतात. त्यांना कायद्याचे ज्ञान असते. निदान हेल्मेटची सुरवात पोलिसांच्यापासून व्हावी, असे विचाराधीन आहे. त्याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. मुख्यालयातील सायबर सेल अधिक अत्याधुनिक बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. जास्तीत जास्त पोलिस कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या तंत्रकौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.''

या वेळी मावळते पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी आदी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी जिल्ह्यात घालून दिलेल्या रोड मॅपवरूनच पुढे जाण्याचा प्रयत्न राहील. गुंडगिरी, सावकारीसह मटका, जुगार, दारूअड्डे अशा अवैध धंद्यांचा बीमोड केला जाईल. ज्या गुन्ह्यांची उकल झालेली नाही त्यासाठी स्वतंत्र पथकांच्या आधारे तपास करू. गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य हवे.
- महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.

Web Title: police helmet compulsory