
मिरजेतील पोलिस मदत केंद्रे बंद
मिरज : शहराचा विस्तार वाढल्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस, प्रशासनाकडून शहरात अनेक ठिकाणी पोलिस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या केंद्राचा हेतू म्हणजे परिसरात शांतता प्रस्थापित करणे व गुन्हेगारीला आळा घालणे असा आहे; मात्र ही केंद्रे सण-उत्सव वगळता कायम बंद असतात. सांगली-मिरज व मिरज ग्रामीण भागात उभारलेल्या मदत केंद्रांत पोलिस नेमण्याची मागणी तनिष्का गटाकडून करण्यात आली आहे.
समतानगर चौक, कर्मवीर भाऊराव चौक, शासकीय रुग्णालय आवार येथे चौकी आहे. चौकीची जबाबदारी गांधी चौक पोलिस ठाण्याकडे आहे. मिरज मार्केट, बोकड चौक, गांधी चौक येथे उभारलेली मदत केंद्रे मिरज शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडून सुभाषनगर येथे पोलिस मदत केंद्र उभारले आहे. तेही बहुतांश वेळा बंद असते, तर मार्केट परिसरातील व महात्मा गांधी चौकातील पोलिस चौकीत वाहतूक शाखेचे कर्मचारी कार्यरत दिसतात. ब्राह्मणपुरी येथील एरंडोली गेट पोलिस चौकी नुकतीच चोरट्याने फोडली. त्याची चर्चा शहरात अद्यापही सुरू आहे. बंद पोलिस चौकी असलेल्या ठिकाणी अनेक दुचाक्या चोरी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी मारामारीची घटना घडली आहे. चौकीची उभारणी करून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मदत केंद्रांची निर्मिती झाली. सुरुवातीचे काही दिवस वगळता ही केंद्रे कायम बंद आहेत. ती तत्काळ सुरू करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सुभाषनगर मार्गावर
चौकी नाहीच...
गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेले स्टेशन चौक स्टेशन रोड या ठिकाणी गुन्हेगारीच्या अनेक घटना घडतात. सुधार समितीसह अनेक संघटनांकडून वारंवार मागणी होऊनही येथे मदत केंद्र देण्यात आले नाही. मिरज-सुभाषनगर मार्गावर शहराचा विस्तार झाला आहे. येथे पोलिस चौकीची मागणी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, मात्र अजून चौकी देण्यात आली नाही.
Web Title: Police Help Centers Miraj Closed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..