पोलिसांची अकार्यक्षमता खुनातून उघड ; कऱ्हाडला वर्चस्ववादातील गुन्हेगारी

सचिन शिंदे
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

बुधवार पेठेत बेछुट गोळीबारात मंगळवारी एकाचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर कऱ्हाड शहरात मोठा तणाव होता. त्यामुळे शहरातील बाजारपेठ बंद होती. 
 

कऱ्हाड  ः लाठ्या-काठ्यांतून होणाऱ्या मारामाऱ्यांच्या जागा कऱ्हाडमध्ये रिल्व्हॉल्वर, पिस्तुलाने घेतल्या. त्याला जमाना झाला असला तरी केवळ उट्टे काढायचा, बदला घ्यायचा, याच हेतूने वर्चस्ववादातून गोळ्या घालून होणारे खून कऱ्हाडच्या स्वास्थ्यालाही धोकादायक ठरत आहेत. मध्यरात्री पाऊणच्या सुमारास कऱ्हाडच्या भरवस्तीत शिरून पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयिताचा गोळ्या घालून खून झाला. त्यामागे टोळीसदृश गुंडगिरी आणि वर्चस्ववाद नक्कीच आहे. गुन्ह्यांसह गुन्हेगारांवरील पोलिसांचे कमी झालेले नियंत्रण, खबऱ्यांची विस्कटलेली घडी, समाजाची बदललेली मानसिकता या गोष्टी काल मध्यरात्री येथे झालेल्या खून प्रकरणास कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. 

कऱ्हाड आणि गुंडगिरी किंवा दंगल याचे नाते तसे जुनेच आहे. 1990 च्या दशकातील कऱ्हाडचे वातावरण जातीय दंगली स्वरूपाचे होते. मात्र, त्यानंतर गल्लीगल्लीतील वाद आणि वर्चस्ववाद पुढे येऊ लागला. त्यामुळे 1996 नंतर ते गल्लोगल्लीतील भांडणाच्या स्वरूपातील दंगली पुढे आल्या. त्या काळातील पोलिस अनेक अर्थाने त्यावर वचक ठेवताना दिसत होते. नेहमीच त्यांना यश येत होते. पोलिस अधीक्षक (कै.) अशोक कामटे यांच्या काळात बऱ्यापैकी कऱ्हाडच्या गुंडगिरीला आळा बसविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर 2000 पासूनची गंडगिरी वर्चस्ववादाकडे वळाली. मात्र, ते होताना गुंड व टोळ्या पोसल्या गेल्या. त्या काळात पोलिसही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत गेले. त्यानंतर आजवर महाराष्ट्र केसरी संजय पाटील, सल्या चेप्या, बबलू माने यांचे खून झाले. मानेवर गोळीबार करणाऱ्याला तेथेच जमावाने मारून टाकले आणि पुन्हा तिसऱ्यांदा कऱ्हाड दुहेरी खुनाने हादरले. 
कऱ्हाडच्या समाजमनाचा थरकाप उडवणारी काल कऱ्हाडच्या बुधवार पेठेत मध्यरात्री खुनाची घटना घडली. त्यामागे अनेक कंगोरे आहेत. गुन्हेगारांच्या हालचालींकडे पोलिसांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पोलिसांची समाजाशी नाळ तुटलेली आहे. त्यांच्या खबऱ्यांचे जाळे पूर्णतः विस्कटलेले आहे. शहरात म्हणाव्या तितक्‍या ताकदीचे अधिकारी नाहीत. जे आहेत, त्यांना गुन्हेगार जुमानत नाहीत. रात्री उशिरा एखाद्या पोलिसांनी हटकले तर गुन्हेगार त्यांच्यावर हल्ला करतो, यावरून पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटलेले आहे, हेच स्पष्ट होते. गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती ठेवण्यात शहर पोलिस ठाण्याच्या "डीबी' पथकाला साफ अपयश आलेले आहे. त्यामुळे "डीबी'ची पुनर्रचना करण्याची गरज आहे. "डीबी'ला ज्या कामासाठी स्वतंत्र अधिकार दिले जातात, त्या अधिकारांचा वापर न करता केवळ अवैध व्यावसायिकांशी अर्थपूर्ण संबंध जोपासण्याचा उद्योग ते करताना राजरोसपणे दिसतात. त्यामुळेच कऱ्हाड अस्वस्थ झाले आहे. पोलिस ठाण्यात सक्षम अधिकाऱ्यांची कमरता आहे. त्यामुळेही गुन्हेगारांचे फावते आहे. सल्या चेप्यानंतर वाढणाऱ्या गुंडांच्या टोळ्या, त्यांच्यातील वर्चस्ववाद, खंडणीसारखा प्रकार असा सगळ्याच गोष्टीकडे पोलिसांनी म्हणाव्या तितक्‍या गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे कऱ्हाडचे सामाजिक स्वास्थ्य धोक्‍यात आले आहे. अनेकजण राजरोसपणे पिस्तूल घेऊन फिरतात. त्याची माहिती पोलिसांना मिळते. त्या संशयिताला उचलून आणले जाते. मात्र, कारवाई न करता तडजोड केली जाते, हा प्रकार बंद झाल्याशिवाय कऱ्हाडच्या गुन्हागारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवता येणार नाही. 

...अशी आहे स्थिती 
सल्या चेप्यानंतरच्या गुन्हेगारांच्या टोळ्यांवर पोलिसांचे नियंत्रण नाही. 
पोलिसांच्या खबऱ्यांचे जाळे विस्कटले. 
पिस्तूल असणाऱ्यांवर कारवाईपेक्षाही पोलिसांनी जपले अर्थपूर्ण संबंध. 
गुन्हेगारांच्या टोळ्यांतील वर्चस्ववादाच्या प्रकारांकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष. 
पोलिस ठाण्यात म्हणाव्या तितक्‍या ताकदीचे अधिकारी नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police inefficiency exposed by murder