'तो' निष्ठावान तुमचा मुलगा तर नाही ना?

बी. आर. पाटील,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

साताऱयातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱयाचं हे पत्र महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना, पालकांना.

साताऱयातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱयाचं हे पत्र महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना, पालकांना.

सुजाण नागरिकांना, 
स. न. वि. वि. 

कोणतीही निवडणूक म्हटलं, की प्रचार आलाच! अलीकडे प्रचार हा निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य घटक बनला आहे. पूर्वी परिस्थिती वेगळी होती. निवडणूक रिंगणातला उमेदवार सामान्य मतदारांच्या कायम पाहण्यातला नसायचा. नावानं जरी तो लोकांना माहीत असला तरी नेमका हाच तो हे लोकांना समोरून पाहून सांगता यायचं नाही. कारण लोकांना उमेदवाराचं फारसं दर्शन व्हायचं नाही. लोकांनी ब्लॅक व्हाईट एक पानी कागदी पॅम्पलेटवरच्या फोटोतच काय ते त्यास पाहिलेलं असायचं. 

निवडणूक लागली, की अशा उमेदवाराची वाडी- वस्तीतल्या मतदारांशी किमान एकदा तरी भेट व्हावी म्हणून त्याचा दौरा कार्यक्रम भागात आखला जायचा. एखादा अपवाद वगळता असे दौरे नियोजित वेळेनुसार पार पडल्याचं ऐकीवात नाही. रातरातभर लोकं उमेदवाराची वाट बघत बसायचे. बत्तीच्या उजेडात पहाटे पहाटेपर्यंत सभा चालायच्या. सभा कसली, पाच 25 लोकांची भेट! गावातल्या चावडीसमोर किंवा देवळात उपस्थितांसमोरच ध्येय- धोरण ठरायची, उमेदवारासोबतचा किंगमेकर गावातल्या प्रमुखाच्या कानात कुजबुजायचा. त्या दोघांत काय ते "शब्द' दिले- घेतले जायचे. अशा बाबतीतला शब्द एकदा दिला की दिला. दोघंही शब्दांचे पक्‍के नंतर मग बिनधास्त. कारण असं, की त्या काळात एखाद्याच्या शब्दांवर गावंच्या गाव चालायची आणि अशा म्होरक्‍यालाच उमेदवार बरोबर हेरायचे. एकंदर निवडणुकीआधी मतदारांना उमेदवाराचं दर्शन फार फार तर एकदा- दोनदा व्हायचं. म्होरक्‍या मात्र कायम संपर्कात राहायचा आणि चावडीवर पोरांसमोर भेटीच्या गप्पा हाणायचा. अशा म्होरक्‍यांवरच निवडणुका अवलंबून असायच्या. गावोगावी असे खरे आणि बेगड म्होरके चिक्‍कार! 
कालांतरानं म्होरक्‍यांच्याही शब्दांची धार कमी व्हायला लागली. दोघांतला विश्‍वास पातळ होऊ लागला. त्यांच्या शब्दाची जागा आश्‍वासनांनी घेतली आणि काळाच्या ओघात निवडणुका आश्‍वासनाच्या स्वाधीन झाल्या.

उमेदवाराने म्होरक्‍यांना नी म्होरक्‍यांनी पुढं भागात लोकांना दिलेली ती आश्‍वासनं पुढच्या काळात कधी पाळली गेली, तर कधी नाही. न पाळल्या गेलेल्या आश्‍वासनांवर म्होरक्‍यांची कार्यकर्त्यांसमोरची वाक्‍ये मात्र लक्षवेधी असायची. ""एका पाकाळनीनं काय देव म्हातारा होत नाही, याचा वजपा पुढच्या वेळेला काढू, मग तरी कळलं आम्ही काय आहोत ते वगैरे'' कार्यकर्त्यांसमोर अशा शब्दांत म्होरके निर्धार व्यक्‍त करायचे. कधी त्या निर्धारावर पाच वर्षे ते ठाम राहिले तर कधी (..?) जे ठाम राहिले ते सोडा; पण जे दल बदलू झाले त्यांच्या बाबतीत मात्र आम लोकांना हळूहळू वेगवेगळ्या शंका कुशंका यायला लागल्या. दोघांत काहीतरी छुपा करार झाला असावा? असा बोभाटा उठायचा! आपसात व्यवहार झाल्याची वार्ता उमटायची. अनेक तर्कवितर्क लढविले जायचे अशा बाबतीत. 

म्होरक्‍या संदर्भाने अशा तर्कातून निघालेल्या निष्कर्षाबाबत पुढं मात्र लोकांची खात्री व्हायला लागली. कारणंही तशीच. मिळकतीची काही एक साधनं नसताना म्होरक्‍यांच्या घरांच्या खापऱ्या पालटल्याची चित्रं दिसाय लागायची. कौलारू छत जाऊन आधी मेंगलोरी व नंतर स्लॅब पडायला लागले, खोपटातले नांगर, कुळव, बैलगाड्या गेल्या आणि दारात ट्रॅक्‍टर उभे दिसू लागले. शेती मळ्यांची रूपांतर फार्म हाउसेसमध्ये झाली. सिटी फाटलेल्या एझडी, जावा, राजदुती गेल्या आणि फॅन्सी नंबर प्लेटी लावलेल्या बुलेटी ठोका टाकू लागल्या. पट्ट्याच्या विझारी न्‌ रंगीत तीन बटनी शर्ट गेली आणि कंची करून व्हाईट ऍण्ड व्हाईट इस्त्री टाईट आली. पायातानांच्या जागा सॅन्डल, शुजनं घेतल्या. टेलिफोनच्या लॅंडलाइन गेल्या अन मोबाईल फोन आले. चमको मोबाईल हॅंडसेटवर बोलतानाचे फ्लेक्‍स चौकाचौकांत दिसू लागले. वाढदिवसानिमित्तानं लोक गर्दी करायला लागले. पारदर्शक शर्टाच्या आतनं गळ्यातली सोन्याच्या कड्यांची लोढण्याऐवजी चेन आणि झिरझिरीत खिशातनं गांधींच्या फोटोची नोट सहज ओळखता यायची.

मनगटावरचे देवादिकांचे गंडे-गोफ गेले व त्यांच्या जागी मोठाले कंडे आले. आधी चांदीचे व पुढे सोन्याची दोन दोन ब्रेसलेट, म्होरक्‍याला लोक "आहो- जावो' बोलायला लागले. आता तर "काय पुढारी?' म्हणून हाका मारत्यात. त्यांच्या वापरून बुक्का पडलेल्या दुचाकी फोन रिसिव्ह करण्यासाठी ठेवलेल्या त्यांच्या "पीए'कडं गेल्या, साहेबांसाठी आता भारी भारी फोर व्हिलर आल्या. 

म्होरक्‍याचं रूपांतर आता अण्णा, भाऊ, दादा, साहेब वगैरे वगैरे अशा अनेक बिरुदावलीत झालं. देवादिकांच्यात आणि महापुरुषांच्या नावाने आलेली तरुण मंडळं आता या साहेबांच्या नावानं बोर्डावर आलीत. गल्ली- गावात युवा प्रतिष्ठाणं आणि ट्रस्टही निर्माण झालेत, साहेबांच्या नावांचे. 
आणि आता स्वतः उमेदवार आहे म्हणे तो. आता तोही कार्यकर्त्यांच्या शोधात आहे. त्यालाही गरज आहे. निष्ठावान व विश्‍वासू कार्यकर्त्यांची! आपल्याही मागं पुढं तरुणांची फळी दिसायला पाहिजे असं वाटतंय त्याला. त्यासाठी तो वाटेल ते करायला तयार आहे. साम- दाम- दंड. 

त्याला कार्यकर्ता पाहिजे तो त्याचं पडेल ते करणार, "आमुक प्रेमी', "तमुक निष्ठावान' असं छापलेलं, टी शर्ट घालून शायनिंग करणारा, साहेबांचे व्यवहार बऱ्यापैकी बघणारा, सिगारेटचा धूर आणि शेंगदाण्याच्या चकण्याबरोबर पेग रिचवत "झिंग' होऊन घरचं सोडून ढाब्यावरच्या चिकन- मटणावर ताव मारणारा, मध्येच मावा चघळत चघळत उमेदवार साहेबाचं कौतुक करणारा, जरा जास्तच चढल्यावर साहेबाचा तोल सांभाळण्यासाठी मागं मागं उभा राहणारा, गेल्या पाच- सहा वर्षातले विरुद्ध उमेदवाराच्या वागण्या - बोलण्यातले विक पाईंट शोधून साहेबांच्या भाषणासाठी मटेरियल पुरविणारा, मतदाराला खिंडीत गाठणारा, साहेबांची फोर व्हिलर चालवता चालवता लीड किती असणार ते पटवून सांगणारा, साहेबाच्या पदयात्रेत हिरिरीनं भाग घेणारा, अलीकडं चालण्या- बोलण्याची ढब बदललेला, दर अर्ध्या तासाला साहेबाला भागातली ऑल्स वेल देणारा, गोरगरिबांना दम भरणारा, रक्तानं भिजलेल्या कपड्यानिशी घरी जाऊ शकणारा, प्रसंगी मतदार पळवणारा, प्रतिस्पर्धी उमेदवाराचं 100 मीटर बाहेरचं बुथ उचकटणारा, उपासीतापासी राहून जागरणं करून साहेबाप्रती आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी वेडा झालेला, राडा करण्याची मानसिक तयारी केलेला, आई- वडिलांच्या भयभीत मानसिकतेला न जुमानणारा, कुटुंबातून रोजच विरोध होतोय म्हणून मतदान संपेपर्यंत घराबाहेर मुक्काम ठोकणारा, गुन्हा दाखल झाला तरी फारसं काही बिघडणार नाही अशा अविर्भावात शिक्षण आणि भविष्यकाळातल्या नोकरीला कायमची तिलांजली देण्याची तयारी ठेवलेला, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी विसरलेला न्‌ आईच्या आजारपणाचं गल्लीत हसू व्हायची वेळ आली तरी तिच्याकडं साफ दुर्लक्ष करणारा, बाबांची जेमते पेन्शन आणि रिटायर्ड लाईफ याकडं तिरस्कारानं बघणारा, असफल जबाबदारीची जाणीव त्यांना वारंवार करून देणारा, लोकं माघारी आपल्याला उडाणटप्पू, भंकस, निष्काम, भानगडखोर, लबाड, व्यसनी वगैरे वगैरे काय काय म्हणतात हे माहीत होऊनही निर्लज्यासारखे डोळे वठारणारा, एक लाजीरवाणं जीवन जगणारा, स्वतःचं आणि कुटुंबाचं भविष्य काळ्याकुट्ट अंधारात हरवलेला, सर्वस्व हरवलेला, होय, सर्वस्व हरवलेला असा कार्यकर्ता पाहिजे त्या उमेदवाराला. खरं सांगतो असलाच पाहिजे. तो निष्ठावान व विश्‍वासू कार्यकर्ता तुमचा मुलगा तर नाही ना..? 
आपला हितचिंतक.

Web Title: Police inspector BR Patil write about satara municipal council election