मिरजेतील 'तो' पोलिस अधिकारी अखेर निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

मिरज : जेवणानंतर वैद्यकिय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर फिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना जबरदस्ती पोलिस ठाण्यात नेऊन पैसे उकळणारा सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब पाटील याला सांगली जिल्हा सुधार समितीने व्हिडिओ चित्रीकरण करून पोलखोल केल्याने आज निलंबित करण्यात आले आहे. 

मिरज : जेवणानंतर वैद्यकिय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर फिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना जबरदस्ती पोलिस ठाण्यात नेऊन पैसे उकळणारा सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब पाटील याला सांगली जिल्हा सुधार समितीने व्हिडिओ चित्रीकरण करून पोलखोल केल्याने आज निलंबित करण्यात आले आहे. 

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास, दोन डी. फार्मसीचे विद्यार्थी जेवणानंतर फिरण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर गेले होते. त्याचवेळी गस्तीच्या पोलिसांनी त्यांना का फिरत आहात, अशी विचारणा करून जबरदस्ती गाडीत डांबून पोलिस ठाण्यात नेले. विद्यार्थ्यांनी भितीपोटी सुधार समितीच्या नितीन मोरेंना पोलिस ठाण्यात मदतीसाठी बोलावले. त्यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब पाटील यांनी 5000 रुपये द्या, अन्यथा गुन्हा दाखल करतो असे संबंधितांना धमकावले. समितीच्या मोरेंनी याला विरोध केला. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण व आयुष्य यामुळे घाबरलेल्या पालकांनी पोलिस अधिकारी पाटील सांगतील त्याप्रमाणे जबरदस्तीने दोन हजार रुपये देऊन विनाकारण गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती केली. मात्र, सदरची घटना समितीच्या नितीन मोरेंनी कॅमेऱ्यात कैद केली व व्हायरल केली.

तसेच समितीच्या वतीने याची तक्रार व पाठपुरावा करण्यात आला. यामुळे आज सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब पाटील यांच्यावर प्रशासनामार्फत निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मिरज शहर पोलिस ठाण्यामध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत करत पोलिसांनी सामान्यांच्या रक्षणासाठी काम केले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. 

सांगली जिल्हा सुधार समितीच्या तक्रारीची व पाठपुराव्याची दखल घेऊन ही कारवाई केली असून, गोरगरीब व असाह्य जनतेची लुबाडणूक करणाऱ्यांना असाच धडा शिकवला जाईल व कायदा हा सामान्यांच्या रक्षणासाठी वापरण्यासाठी सुधार समिती कायम सक्रिय असेल असे समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे यांनी सांगितले. समितीचे तानाजी रुईकर, रविंद्र ढोबळे, जयंत जाधव, युवराज नायकवाडे, प्रविण कोकरे हे यावेळी उपस्थित होते.

Web Title: The police officer in Miraj finally suspended