कुणी कारभारी देता का कारभारी?

जालिंदर सत्रे
सोमवार, 9 जुलै 2018

पाटण - पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची १६ जूनला जिल्हा पोलिस मुख्यालयात बदली झाली. गेले २० दिवस प्रभारींवर ठाण्याचा कारभार चालला आहे. आजपर्यंत चौघांनी प्रभारी म्हणून काही दिवसच काम केले. आता पाचवे प्रभारी दाखल झाले आहेत. त्यामुळे पाटण पोलिस ठाण्याला जिल्हा पोलिस प्रमुख हक्काचा कारभारी कधी देणार, अशी चर्चा तालुक्‍यात होत आहे.

पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी २७ मे २०१७ रोजी पाटण ठाण्याचा कारभार स्वीकारला. जेमतेम एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली. आण्णासाहेब मांजरे यांचा हा कारभार तसा वादग्रस्तच ठरला. त्यांच्या कालावधीत झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. हा अपवाद सोडला तर एकूण कारभार जनतेला समाधानकारक नव्हताच. मोरणा विभागातील पवनऊर्जा प्रकल्पाच्या कंपनी व स्थानिक शेतकऱ्यांतील वादापासून ते चर्चेत आले. १९ मे रोजी लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पोलिस ठाण्यातच दोन पोलिस रंगेहाथ पकडल्याने श्री. मांजरे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच वेळी त्यांची बदली होणार अशी चर्चा होती. मात्र, जिल्हा पोलिस प्रमुखांनी ता. १६ जूनला त्यांना मुख्यालयात पाठवले.

मात्र, गेल्या १५ दिवसांत कारभारी म्हणून पाच तात्पुरते कारभारी आले व पुन्हा स्वगृही गेले. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्यापासून सुरवात झाली. त्यानंतर चार सहायक पोलिस निरीक्षकांनी पाटणला कारभारी म्हणून हजेरी लावली. त्यामध्ये सजन हंकारे, नंतर गिरिश दिगावकर, दीपिका जौंजाळ, महेंद्रसिंग निंबाळकर व आता उत्तम भापकर हे कारभारी म्हणून ठाण्याचा कारभार पाहात आहेत.

सरासरी तीन दिवस एक अधिकारी असा १५ दिवस ठाण्याचा कारभार चालला आहे. अजून किती दिवस जिल्हा पोलिस प्रमुख पाटणला तात्पुरता कारभारी देणार आहेत, अशीच स्थानिकांत चर्चा सुरू आहे.

पूर्णवेळ अधिकाऱ्याची गरज
पाटण तालुक्‍यात संततधार पावसास सुरवात झाली असून, पाटणचा पाऊस सर्वांना परिचित आहे. कधीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, हा इतिहास आहे. त्यामुळे प्रभारी कारभारी देण्याऐवजी जिल्हा पोलिस प्रमुखांनी हक्काचा कारभारी द्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Web Title: Police Officer Patan