बेळगावात 101 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बेळगावात 101 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बेळगाव : फ्रंटलार्इन कोरोना वॉरियर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या शहरासह जिल्ह्यातील १०१ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व बाधित पोलिस सध्या होम आयसोलेशनमध्ये असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची फैलाव झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने १० ते २४ मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी चोवीस तास रस्त्यावर उतरून सेवा बजावत आहेत. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी रस्ते बंद केले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून वाहने जप्त केली जात आहेत.

फ्रंटलार्इन कोरोना वॉरियर्स म्हणून काम करणाऱ्या पोलिसांनी कोरोनाची दुसरी लसही घेतली आहे. दुसरी लस टोचून घेतली असल्याने संबंधित पोलिसांच्या आरोग्याला धोका नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ६६ पोलिसांना कोरोनाने ग्रासले आहे, तर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील विविध पोलिस ठाण्यांत कार्यरत असलेल्या ३५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे एकूण १०१ पोलिस कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. हे सर्वजण होम आयसोलेशनमध्ये असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस टोचून घेतल्या आहेत. सध्या ६५ पोलिस बाधित झाले आहेत. ते सर्वजण होम आयसोलेशनमध्ये असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

-लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पोलिसप्रमुख

शहर पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये ६६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वजण होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

-डॉ. विक्रम आमटे, पोलिस उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com