पोलिस दलही घडवणार गुणवान खेळाडू

Pankaj-Deshmukh
Pankaj-Deshmukh

सातारा - येथील युवकांनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, यासाठी पोलिस दलाने पुढाकार घेतला आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पुढाकाराने पोलिस कवायत मैदानावर पोलिसांच्या पाल्यांबरोबर समाजातील गुणवंत खेळाडू, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञ पोलिस खेळाडूंकडून प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली आहे.

सदरक्षणाय खल निग्रहणाय हे पोलिस दलाचे ब्रिदवाक्‍य. त्यानुसार पोलिस समाजातील खलांचा नाश करण्याचे काम करत असतात. त्यातून चांगल्या लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपोआप पार पडते. त्यापुढे जावून पोलिस दलाबद्दल नागरिकांचा विश्‍वास निर्माण करण्याचे कामही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पार पाडावे लागत असते. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. नागरिकांशी संपर्क साधण्याच्या पुढे जावून समाजाला सुदृढ व सशक्त बनिविण्यासाठी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. सशक्त शरीरात सशक्त मन असते. आपली भावी पिढीही सक्षम बनली पाहिजे, या उद्देशाने त्यांनी आजवर काही व्यक्तींपर्यंत मर्यादित असलेले पोलिस कवायत मैदान पोलिस कुटुंबीयांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुले केले आहे.

शहर व तालुक्‍यातील मुलांनी अनेक क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे. या मातीत अनेक हिरे घडू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. अशा हिऱ्यांनाच पैलू पाडण्याचे काम पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. त्यासाठी पोलिस कवायत मैदानावर कुस्ती, धनुर्विद्या व मल्लखांब या खेळांचे मुला-मुलींना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा पोलिस दलात अनेक गुणवान खेळाडू आहेत.

त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांत यश संपादन केले आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग भावी पिढी घडविण्यासाठी केला जात आहे. या तीनही खेळांतील चांगले खेळाडू या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत. अशा प्रकारच्या खेळांच्या प्रशिक्षणासाठी मुलांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे खेळाची क्षमता असूनही आर्थीक स्थितीमुळे अनेकांना ते घेता येत नाही. त्यामुळे अत्यल्प मोबदल्यात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी चार ते सात या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जात आहे.

या योजनेचा शहर व तालुक्‍यातील मुलांना मोठा फायदा होणार आहे. त्याचा सध्या तीनही क्रीडा प्रकारांतील सुमारे ५० मुले-मुली लाभ घेत आहेत. पोलिस कवायत मैदानावर याबाबतच्या प्रवेशाची माहिती मुलांसाठी उपलब्ध आहे. उत्तम आरोग्यासाठी सध्या प्रत्येक जण व्यायामाकडे वळत असतो. त्यामुळे मुलांबरोबर त्यांच्या पालकांसाठीही पोलिस जीम कमी मोबदल्यात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे मुलांबरोबर पालकांचाही फिटनेस राखून सशक्त समाजासाठी पोलिसांनी टाकलेले हे पाऊल निश्‍चीत कौतुकास्पद आहे.

महिलांसाठी झुंबा डान्सही
फिटनेसची आवड आता महिलांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विविध प्रकारच्या आजारांना दूर राखण्यासाठी ते महत्वाचे आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठीही अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पोलिस करमणूक केंद्रात झुंबा डान्सच्या प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com