कोल्हापूर शहरातील पाच व्हिडिओ पार्लरवर पोलिसांचे छापे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - शहरातील रिगल, लिबर्टी, व्हीनससह पाच व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत नोंदणीपेक्षा अधिक मशिन आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी ९० मशिनसह सुमारे २७ हजारांची रोकड असा साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

कोल्हापूर - शहरातील रिगल, लिबर्टी, व्हीनससह पाच व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत नोंदणीपेक्षा अधिक मशिन आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी ९० मशिनसह सुमारे २७ हजारांची रोकड असा साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी व्हिडिओ पार्लर मालकांसह व्यवस्थापक अशा १२ जणांवर संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल केल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पत्रकारांना सांगितले. 

शहरातील व्हिडिओ पार्लरवर छापे टाकण्याचे आदेश आज दुपारी अचानक उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी पोलिस ठाण्याला दिले. त्यानुसार तीनच्या सुमारास लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व राजारामपुरी पोलिसांनी हद्दीतील रिगल, लिबर्टी, व्हीनस, शिवइच्छा व्हिडिओ पार्लरवर अचानक छापा टाकला. 

अचानक पडलेल्या छाप्यामुळे पार्लरमधील तरुणाईची पळताभुई थोडी झाली. पोलिसांनी पार्लर मालकांसह व्यवस्थापक व कामगार अशा १२ जणांना ताब्यात घेतले. लक्ष्मीपुरीतील रिगल पार्लरमध्ये नऊ हजार ६०० रुपयांची रोकड आणि सात लाख ८० हजार रुपये किमतीच्या ३९ मशिन जप्त केल्या. ‘लिबर्टी’मधून नऊ हजार १२० रुपयांची रोकड आणि दोन लाख ८० हजार रुपये किमतीच्या १४ मशिन जप्त केल्या. 

शाहूपुरीतील लिबर्टी पार्लरमधून चार हजार ३०० रुपयांची रोकड आणि पाच लाख रुपये किमतीच्या २० मशिन, ‘व्हीनस’मधून दोन हजार २१० रुपयांची रोकड आणि पावणेतीन लाख रुपये किमतीच्या ११ मशिन आणि राजारामपुरीतील शिवईच्छा पार्लरमधून एक हजार ७२० रुपयाची रोकड आणि ९१ हजार २०० रुपये किमतीच्या सहा मशिन असा सुमारे १८ लाख ९३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम संबंधित पोलिस ठाण्यांत सुरू आहे. तसेच, याबाबत जागामालकांवरही गुन्हे दाखल करणार असल्याचे डॉ. अमृतकर यांनी सांगितले.

यांच्यावर गुन्हा दाखल

  •  लक्ष्मीपुरी ः रिगल पार्लरचा मालक ः रशिद चित्तेवान, व्यवस्थापक ः राजू वसंत कोरवी, लिबर्टी पार्लरचा मालक : जयदीश घाडगे, व्यवस्थापक ः रियाज अजीज पटवेगार.
  •  शाहूपुरी ः लिबर्टी पार्लरचा मालक ः नदीम सज्जाम मुजावर, व्यवस्थापक ः सचिन आनंदराव मोरे, सचिन कोतमिरे.
  •  व्हीनस पार्लरचा (मध्यवर्ती बसस्थानक परिसर) मालक ः रवींद्र शंकर मुसळे (रा. गडहिंग्लज), व्यवस्थापक ः विनोद धनाजी दरेकर, दशरथ हणमंत पोतदार. 
  •  राजारामपुरी ः शिव इच्छा पार्लरचा मालक ः अभय बाळासाहेब साईकर, व्यवस्थापक ः मयूर बाळासाहेब सुतार.
Web Title: Police raids on five video parlors in Kolhapur city