मलकापूर, मल्हारपेठ पोलिस ठाण्यांना होकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

कऱ्हाड, पाटण पोलिसांचा भार हलका!
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वतंत्र पोलिस ठाण्यांना दिलेल्या हिरव्या कंदिलामुळे कऱ्हाड शहर आणि पाटण पोलिस ठाण्याचा भार हलका होण्यास मदत होणार आहे.

कऱ्हाड - दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, त्या तुलनेत उपलब्ध असणारे पोलिस आणि वाढणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण याचा विचार करता नवीन पोलिस ठाण्यांची गरज कऱ्हाड- पाटण तालुक्‍यात भासू लागली आहे.

त्याअंतर्गत मलकापूर आणि पाटण तालुक्‍यांतील मल्हारपेठ येथील नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित पोलिस ठाण्यांच्या मंजुरीच्या कार्यवाहीसाठी ‘हिरवा कंदील’ दिला आहे. 

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या नगन्य असल्याने आणि गुन्ह्यांची वाढणारी संख्या याचा ताळमेळ बसणेच कठीण बनलेले आहे. त्यामुळे उपलब्ध पोलिसांवरच कामाचा मोठा ताण येत आहे. त्यातच पोलिस ठाण्यांना जेवढी पदे मंजूर आहेत, तेवढी ती कधीच पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कर्मचारी मर्यादित आणि कामे जास्त अशी सद्यःस्थिती आहे. त्याचा विचार करून चार वर्षांपूर्वी मलकापूर आणि मल्हारपेठ येथे स्वतंत्र पोलिस ठाणे करण्यात यावे, असे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यासाठी संबंधित नवीन पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ठ करण्यात येणारी गावे, लोकसंख्या याचा सर्व्हे करण्यात आला होता.

मात्र, त्यानंतर त्याला पाच वर्षांचा कालवधी होत आला, तरीही नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव प्रलंबितच राहिला आहे. काही दिवसांपूर्वी कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात पोलिसांच्या प्रलंबित कामकाजाचाही आढावा झाला.

त्यामध्ये मल्हारपेठ आणि मलकापूर येथील पोलिस ठाण्यांच्या प्रलंबित प्रश्नावरही चर्चा झाली. त्यानंतर गृहराज्यमंत्री केसरकर यांनी संबंधित पोलिस ठाण्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Station Malkapur Malharpeth Deepak Kesarkar