बनावट दाखल्याद्वारे पोलिस उपनिरीक्षक पद

बनावट दाखल्याद्वारे पोलिस उपनिरीक्षक पद

कोल्हापूर - बनावट जातीच्या दाखल्याआधारे पोलिस उपनिरीक्षक पद प्राप्त करणाऱ्या अभियांत्रिकी पदवीप्राप्त तरुणाचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले.  किरण राजेंद्र सोलगे (वय २५, रा. सोलगे मळा, इचलकरंजी) असे त्या संशयिताचे नाव आहे.

लोकसेवा आयोगातर्फे २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेत त्याने एका मागासवर्ग जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे चौकशीत पुढे आले. अशी बनावट प्रमाणपत्रे देणारे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता असून, त्यानुसार तपास सुरू आहे. त्याला शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग केल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

इचलकरंजीत किरण सोलगे राहतो. त्याने अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१६-१७ मध्ये पोलिस उपनिरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा झाली होती. या परीक्षांसाठी किरणने अर्ज भरले होते. त्याची मूळ जात हिंदू-धनगर आहे. तरीही त्याने भरलेल्या दोन अर्जांपैकी एकात हिंदू-धनगर, तर दुसऱ्या अर्जात अन्य एक मागास जात असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर तो पोलिस उपनिरीक्षक पदाची लेखी व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला शासनाकडून उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेण्याची ऑर्डर दिली जाणार होती. दरम्यान, २३ ऑक्‍टोबर २०१७ ला कसबा बावडा येथे उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक चाचणीत किरणने धावण्याच्या स्पर्धेसाठी डमी उमेदवाराचा वापर केला होता. असा तक्रार अर्ज कोल्हापूर पोलिस दलाला प्राप्त झाला. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला.

तपासात किरणची मूळ जात हिंदू-धनगर असल्याचे पुढे आले. तरीही त्याने उपनिरीक्षक पदासाठी दुसऱ्या मागास जातीचा आधार घेत त्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. जातीच्या सवलतीचा आधार घेऊन किरणने उपनिरीक्षक पद मिळविल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याच्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. सायंकाळी त्याला पोलिसांनी अटक केली. कारवाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र सानप, कर्मचारी सचिन पाटील, अनिल ढवळे, विलास किरोळकर, अनिल पास्ते, रमेश डोईफोडे, असिफ कलाईगार यांनी केली. 

शाळेच्या दाखल्यावर बनावट जात
संशयित किरण सोलगेने लोकसेवा आयोगाच्या उपनिरीक्षक पदासाठी शासकीय नोकरीत सवलत मिळविण्यासाठी अर्जात अन्य मागास जात नमूद केली. त्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ती बनावट जात लावून तशी माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. त्याआधारे संबंधित जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. दरम्यान, या प्रमाणपत्राची जातपडताळणीही प्राथमिक स्तरावर झाली होती. मात्र, हे प्रकरण आलेल्या तक्रार अर्जावरून उघड झाल्याचे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांनो, सावध राहा...
स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी गैरकृत्य करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करू नये. असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी शासकीय व निमशासकीय नोकरीत अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आमिष दाखविणाऱ्यांपासून दूर राहावे, असे आवाहन कोल्हापूर पोलिस दलातर्फे केले आहे. 

बनावट जात प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता आहे. ते शोधण्याचे काम पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 
- तानाजी सावंत,
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com