तडिपार गुंडावर पैसे उधळणारा पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नगर : मोहरम विसर्जन मिरवणुकीत तडीपार गुंड रशीद दंडा याच्यावर पैसे ओवाळल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यातील हवालदार शकील सय्यद यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी आज हा आदेश दिल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

नगरमध्ये 10 सप्टेंबरला मोहरम विसर्जन मिरवणूक पार पडली. त्यात तडीपार गुंड रशीद दंडा सहभागी झाला होता. या मिरवणुकीत कोतवाली पोलिस ठाण्यातील हवालदार शकील सय्यद यांनी पैशांची ओवाळणी केली. ते पैसे त्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना वाटले. मिरवणूक संपल्यानंतर आठ दिवसांनी (ता. 17) हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यावरून त्याच दिवशी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, या चौकशीत तथ्य असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यानंतर सय्यद यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. एका तडीपार गुंडावर पैसे उधळण्याचा प्रकार पोलिस खात्यासाठी अशोभनीय असल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षकांनी आज ही कारवाई केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police suspend in nagar