भाईचा बर्थ डे... वाजले तीन तेरा!

birthday-celebration
birthday-celebration

नागठाणे - 'भाईचा बर्थ डे, वाजले बारा' या 'मुळशी पॅटर्न' सिनेमातील गाण्याची सध्या युवा वर्गात मोठी क्रेझ आहे. त्याचाच कित्ता गिरवू पाहाणाऱ्या येथील 'बर्थ डे बॉइज'चे पोलिसांनी मात्र तीन तेरा वाजवले!

'मुळशी पॅटर्न'मधल्या पिट्याभाईच्या वाढदिवसाचे जल्लोषी वातावरण सध्या युवकांना भुरळ पाडताना दिसते. सातारा तालुक्यातील नागठाण्यात त्याच मार्गाने असे 'बर्थ डे सेलिब्रेशन' करणे मात्र युवकांच्या चांगलेच अंगलट आले. गावातील तीन वेगवेगळ्या गटातील अल्पवयीन मुलांच्या वाढदिवसाचे निमित्त होते. जोशात असणा-या 'बर्थ डे बॉईज'च्या अनुयायांनी प्रथम रस्त्यातच केक कापला. त्यानंतर तिन्ही गटांत जल्लोष साजरा करण्याची जणू चढाओढ सुरू झाली. काही उत्साही युवकांनी गाड्यांचे हॉर्न कर्णकर्कशपणे वाजवायला सुरूवात केली. काहींनी फटाक्यांची आतषबाजी सुरु केली. त्याची झळ सामान्य नागरिकांना बसू लागली.

याबाबतची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर सुरू असलेल्या मिरवणुकीत सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, सहायक फौजदार संजय दिघे, प्रशांत महाडिक, किरण निकम, स्वप्नील माने, समाधान राक्षे, वैभव डांगरे या पोलिसांनी दमदार 'एन्ट्री' केली. या वेळी मिरवणुकीत सामील झालेल्या अनेक चाहत्यांना केकऐवजी पोलिसांच्या दंडुक्याचा 'प्रसाद' मिळाला. केवळ यावरच हे 'सेलिब्रेशन' थांबले नाही.  सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांनी तिन्ही 'बर्थ डे बॉईज'ची वरात लवाजम्यासह थेट बोरगाव पोलिस ठाण्यात आणली. आठ युवकांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. एक चार चाकी तसेच दोन दुचाकींवरही दंडात्मक कारवाई केली गेली. या प्रकरणावर कसाबसा पडदा पडला खरा. मात्र 'बर्थ डे बॉईज' अन् त्यांच्या चाहत्यांना मिळालेल्या पोलिसी 'प्रसादाची' खमंग चर्चा दिवसभर गावात सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com