पोलिसांच्या वाहनांना प्रवेश कसा? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कोल्हापूर - भवानी मंडपात सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या खासगी वाहनांना मात्र थेट प्रवेश दिला जात आहे. पोलिसांनी सरसकट सर्वांना एकच नियम लावावा. ‘आपला तो बाब्या...’ ही भूमिका बदलावी; नाही तर आम्ही आमची खासगी वाहने कोणाची पर्वा न करता थेट मंडपात लावू, अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत. 

कोल्हापूर - भवानी मंडपात सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या खासगी वाहनांना मात्र थेट प्रवेश दिला जात आहे. पोलिसांनी सरसकट सर्वांना एकच नियम लावावा. ‘आपला तो बाब्या...’ ही भूमिका बदलावी; नाही तर आम्ही आमची खासगी वाहने कोणाची पर्वा न करता थेट मंडपात लावू, अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत. 

भवानी मंडपात रविवारी रात्री भरधाव ट्रक घुसला. असा प्रकार पुन्हा घडू नये, ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व जपले जावे, यासाठी भवानी मंडप कालपासून सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला. भवानी मंडप, एमएलजी आणि विद्यापीठ हायस्कूल येथे शहर वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस्‌ लावून सर्व वाहने रोखली. पोलिस प्रशासनाने अचानक हा निर्णय घेतल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळी सुटीचे दिवस सुरू असल्याने पर्यटकांना त्याची अधिक झळ बसत आहे. 

पार्किंगसाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना वाहन कोठे लावायचे? हा दिव्य प्रश्‍न पडत आहे. मिळेल त्या रस्त्याकडील जागेत वाहन लावण्याशिवाय वाहनचालकांना गत्यंतर नाही, मात्र बेशिस्त पार्किंगच्या नावाखाली क्रेनने वाहन उचलून नेण्याच्या पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. भवानी मंडपाजवळ आलेल्या पर्यटकांना कोठे वाहन पार्किंग करावे, कोठे करू नये, पार्किंगच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग कसा आहे, याची माहिती देणारा एकही फलक उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे.  भवानी मंडपात सरकारी सोडून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या मोटारसायकली व मोटारी मात्र भवानी मंडपात लावल्या जातात. जुना राजवाडा पोलिस ठाण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात
आलेल्या दोन व्हॅन आणि मोटारसायकली व्यतिरिक्त इतर वाहने नाहीत. तरी देखील पोलिसांच्या मालकीची वाहने मंडपात का लावली जातात? आपल्याला एक अन्‌ दुसऱ्याला एक, असा नियम का करता? असा नागरिकांचा सवाल सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. 

आमचीही वाहने पािर्कंग करू... 
आम्हीही शासनाचे कर भरणारे सामान्य नागरिक आहोत. त्यामुळे पोलिसांच्या खासगी वाहनांना भवानी मंडपात प्रवेश दिला तर आम्हीही आमची वाहने थेट भवानी मंडपात आणून पार्किंग करू, असे इशारेही सोशल मीडियावर नागरिकांकडून दिले जात आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Web Title: police vehicles issue kolhapur