कर्तव्य बजावताना कंटेनरची धडक बसून पोलिसाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

नगर-सोलापूर महामार्गावर मांडवगण फाटा शिवारात आज सकाळी कंटेनरची मागून धडक बसून, कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार शहाजी भाऊराव हजारे (वय 43, रा. पोलिस मुख्यालय, मूळ रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

नगर  : नगर-सोलापूर महामार्गावर मांडवगण फाटा शिवारात आज सकाळी कंटेनरची मागून धडक बसून, कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार शहाजी भाऊराव हजारे (वय 43, रा. पोलिस मुख्यालय, मूळ रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे मृत पोलिसाचे नाव आहे. 

shaji hajare

 

अधिक माहिती अशी : पोलिस हवालदार हजारे मागील साडेचार वर्षांपासून महामार्ग पोलिस विभागात कार्यरत होते. हजारे यांच्यासह चार महामार्ग पोलिस आज सकाळी नगर-सोलापूर रस्त्यावरील मांडवगण फाटा (ता. श्रीगोंदे) येथे वाहनांवर कारवाई करीत होते. त्या वेळी रस्ता ओलांडताना मागून आलेल्या कंटेनरची हजारे यांना जोराची धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, असा परिवार आहे. 

दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर हजारे यांचा मृतदेह चिचोंडी पाटील येथे नेण्यात आला. पुणे विभागाचे महामार्ग पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, नगरचे अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस कर्मचाऱ्यांनी हवेत बंदुकीच्या 21 फैरी झाडून त्यांना सलामी दिली. 

कंटेनरचालकास कोल्हारमध्ये पकडले 
अपघातानंतर कंटेनरसह चालक भरधाव निघून गेला. महामार्ग पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. बिनतारी संदेशाद्वारे बाभळेश्‍वर पोलिस चौकीला माहिती देऊन कंटेनर पकडण्यास सांगितले. पोलिसांनी कोल्हारजवळ कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Policeman dies after hitting a container while on duty