पोलिओग्रस्त शोएबला फिकीर सापांच्या जिवाची !

पोलिओग्रस्त शोएबला फिकीर सापांच्या जिवाची !

कोल्हापूर - शोएब सोईफ बोबडे याच्या उजव्या हाताला व पायाला पोलिओ. त्याला सोन्याचे मणी बांधता येणार नाहीत, असा सहकाऱ्यांचा तर्क. महिन्यात मणी बांधण्याच्या कलेत शोएब तरबेज झाला. त्याच्या अंगातल्या आणखी एका कलेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. साप पकडण्यातलं त्याचं कौशल्य भल्याभल्यांना आश्‍चर्यचकित करणारं ठरलं. त्याहीपेक्षा तो मानवीवस्तीत आलेल्या सापांना जीवदान देतो, याचं कुतूहल अनेकांच्या काळजात घर करून गेलं, आजही तो कौशल्याला माणुसकीची जोड देत आपलं काम इमानेइतबारे करतो आहे.

शोएबने बालपणी ‘डिस्कव्हरी’ चॅनेल डोळ्यात साठवलं होतं. पक्षी-प्राण्यांच्या देखभालीचा गाभा असणारे कार्यक्रम त्याच्या डोक्‍यात बसले होते. बारा वर्षापूर्वी फुलेवाडीतील त्याच्या घराशेजारी साप आल्याचा बोभाटा झाला होता. शोएबचा साप पकडण्याचा तो पहिला प्रसंग होता. मनात भीतीचा लवलेश न ठेवता त्याने तो हिमतीने पकडला. त्याला त्याने त्याला जीवदान दिले. त्याच्या या अनोख्या कामगिरीला एक तप पूर्ण झाले आहे. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या शोएबची प्रतिकूल परिस्थिती. त्याचे वडील मटण मार्केटमध्ये कामाला होते. आई हसीना, भाऊ वसीम कुटुंबाला हातभार लावण्यासाठी राबत होते. शोएबच्या उजव्या हाताचा पोलिओ त्यांना अस्वस्थ करणारा होता. शोएबने साप पकडून स्वत:चा आत्मविश्वास उंचावला. पुढे त्याच्या आवडीच्या कामाचा तो धागा झाला. 

अलगद पकडतो साप

विषारी व बिनविषारी साप पकडण्यातलं तंत्र तो कोणाकडूनही शिकला नाही. देवेंद्र भोसले, अस्लम नदाफ, अमित सय्यद यांच्याशी झालेल्या मैत्रीच्या नात्याने त्याला साप पकडण्यात निष्णात केले. नाग, घोणस, मण्यार, कवड्या, धामण, धूळ नागीण, खापर खवल्या, वाळा असे नाशाविध जातींचे साप त्याने अलगद पकडले. वाईल्ड प्रोटेक्‍शन ॲन्ड रीसर्च सोसायटीचा सदस्य झाल्यानंतर त्याने संस्थेसाठी वेळ देणे थांबवलेले नाही. शहर परिसरात कोठेही साप आल्याची वर्दी येवो, तो हजर होतो. फॉरेस्ट खात्याकडे पकडलेला साप देणं कर्तव्य समजतो. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले.

मणी बांधण्यातही तरबेज

घरच्या बेताच्या स्थितीला हातभार लावण्यासाठी तो सोनारकाम शिकण्यासाठी गेला. मालक महादेव देसाई यांनी त्याच्यावर विश्वास टाकला. पोलिओमुळे शोएबला हे काम जमणार नाही, असा अंदाज बांधला. त्याने त्याला केवळ छेद नव्हे तर भगदाड पाडण्याचे काम केले. दिवसभरात तो अडीच हजार मणी बांधतो. हजार मण्यांमागे त्याला दोनशे रुपये मिळतात. महिन्याकाठी सुमारे बारा हजार रुपयांची तो तजवीज करतो. उजव्या हाताला असलेली पोलिओची अडचण त्याच्या मार्गात अडथळा ठरलेली नाही, हेच विशेष. यंदाच्या अतिवृष्टीत तो सापांना जीवदान देण्यात पुढे होता. पुराच्या पाण्याबरोबर घरात शिरलेल्या सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडत होता. 

साप वाचवूयाचा संदेश

सर्वसामान्यांना साप पकडण्यासाठी सोसायटीने प्लास्टिकचे ट्रॅप केले आहेत. सापांची हत्या करण्यापेक्षा त्यांना वाचविण्यासाठीच्या ट्रॅपचा वापर करण्यासाठी तो धडपडतो आहे. ’सोसायटीचा सदस्य असल्याचा अभिमान असून, सापांच्या जिवावर उठण्यापेक्षा त्यांना वाचविण्यासाठी पुढे येऊया,’ असा त्याचा साधा संदेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com