करमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलते आहे

करमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलते आहे

करमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी झालेल्या हल्ला प्रकरणानंतर अधिकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर बाजार समितीचे संचालक संतोष वारे यांच्यावर झालेला हल्ला यामुळे पुन्हा त्यात भर पडली आहे.

सभापती निवडीवेळी झालेल्या हल्ला प्रकरणात करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव जयवंतराव जगताप यांना उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला. त्यानंतर सहा दिवसातच बाजार समितीचे बागल गटाचे संचालक वारे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात नगराध्यक्ष जगताप यांच्यावर महीन्यात 307 चा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे करमाळाचे राजकारण दिशा बदलत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व सभापती शिवाजी बंडगर यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात माजी आमदार जयवंतराव जगताप, त्यांचे चिरंजीव नगराध्यक्ष जगताप यांच्यासह नऊ जणांविरोधात 307 चा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान 12 नोव्हेंबरला वैभव जगताप हे उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपुर्व अंतरिम जामीनच्या चौकशीसाठी करमाळा पोलिसात हजर झाले होते. तेव्हा वारे यांच्यावरील हल्लाप्रकरणी त्यांना अटक होणार असे बागल गटाला वाटत होते. मात्र जगताप यांच्या विरोधात सबळ पुरावा नसल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई केली नसल्याचे  सांगण्यात आले. त्यामुळे जगताप यांना दिलासा मिळाला आहे .

बागल गटाचे समर्थक व बाजार समितीचे संचालक वारे 8 नोव्हेंबरला मोटारसायकलवरून घरी जात असताना त्यांच्यावर पाठीमागून लोखंडी गज, तलवारीने हल्ला झाला होता. अशी फिर्याद त्यांनी करमाळा पोलिसात दिली आहे. त्यात नगराध्यक्ष जगताप व अन्य दोघे अनोळखी यांची नावे आहेत. त्यानुसार जगताप यांच्या विरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 नोव्हेंबरला दुपारी नगराध्यक्ष जगताप हे माजी नगरसेवक अॅड. कमलाकर वीर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यासह करमाळा पोलिसांत हजर झाले. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, उपनिरीक्षक नझीर खान यांनी त्यांची चौकशी केली. वारे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. आतापर्यंत सबळ पुरावा नसल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर नगराध्यक्ष जगताप यांनी वारे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाविषयी चर्चा सुरू आहे.

8 नोव्हेंबर रोजी आम्ही शेकडो कार्यकर्ते नगराध्यक्ष जगताप निवासस्थानी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होतो. नगराध्यक्ष जगताप हे संध्याकाळी 6 ते 10 आमच्या सोबत होते. नगराध्यक्ष जगताप यांच्या विरोधात बागल गटाने राजकीय हेतुने वारेला पुढे घालुन खोटा गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे या गुन्ह्याची योग्य चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे केली असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे यांनी सांगितले आहे.

आपण नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे. नगराध्यक्ष जगताप यांनी वैयक्तिक रोषातून तसेच राजकीय दृष्ट्या वैफल्यग्रस्त झाल्याने मला धमकवण्याच्या हेतुने हल्ला केला. या हल्ल्याचे कारण मार्केट कमिटीतील सत्तांतरच आहे. याचबरोबर मार्केट कमिटीतील जगतापांचा गैरकारभार उघड पाडत असताना त्या ठरावावर मी सह्या करु नये, या हेतूने हा हल्ला केला आहे. 

- संतोष वारे, संचालक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com