एमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार झाला. धक्कादायक म्हणजे सत्य आणि कायद्यानुसारच कामकाज झाले पाहिजे अशी भूमिका असलेल्या प्रशासनानेही यात हस्तक्षेप केला नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाला वाटेल त्या पद्धतीनेच महापालिकेचे कामकाज होत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले. त्यांना एमआयएमच्या सदस्यांनी चांगलाच हिसका दाखवला.

सोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या जोरदार मागणीमुळे सत्ताधारी भाजपला एक पाऊल मागे सरकावे लागले आणि पूर्वी निश्चित केलेल्या विषयांचा प्राधान्यक्रम बदलावा लागला.

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार झाला. धक्कादायक म्हणजे सत्य आणि कायद्यानुसारच कामकाज झाले पाहिजे अशी भूमिका असलेल्या प्रशासनानेही यात हस्तक्षेप केला नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाला वाटेल त्या पद्धतीनेच महापालिकेचे कामकाज होत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले. त्यांना एमआयएमच्या सदस्यांनी चांगलाच हिसका दाखवला.

विषयपत्रिकेवर दुहेरी जलवाहिनीबाबत अभिनंदनाचा विषय 19 व 20 क्रमांकावर, तर कठुआ अत्याचाराच्या निषेधाचा विषय 17 व्या क्रमांकावर आहे. विषयांचे प्राधान्यक्रम ठरविताना 1 ते 16, त्यानंतर 19, 20, 17 व 18 असे विषय निश्चित करण्यात आले. 16 क्रमांकापर्यंतचे विषय झाल्यावर प्राधान्य निश्चित केल्यानुसार नगरसचिवांनी 19 क्रमांकाच्या विषयाचे वाचन केले. त्यास एमआयएमच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. स्वत़:चे कौतुक महत्त्वाचे की एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध महत्त्वाचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तरीसुद्धा 19 व 20 क्रमांकच घ्यावा, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. त्यावेळी एमआयएमच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

नगरसेविका व काही नगरसेवक महापौरांसमोर आले. कठुआचा विषय महत्त्वाचा असल्याने तोच विषय घ्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी दोन पाऊले मागे सरकण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि कौतुकाच्या विषयाआधी 17 व्या क्रमांकाच विषय घेऊन निषेधाचा ठराव करण्यात आला. या प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सर्वच पक्षाच्या सदस्यांनी केली. 

या विषयावरील चर्चेत सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव, भाजपचे प्रा. नारायण बनसोडे, शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर, तौफीक शेख, रियाज खरादी, चेतन नरोटे यांनी घटनेचा निषेध केला. या संदर्भात महापालिकेने राज्य व केंद्र शासनाला पत्रव्यवहार करावा. अशा प्रकरणातील दोषींवर तातडीने कडक कारवाई कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या सदस्यांनी केली.

एकीकडे मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना, अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आपली मुलगी जन्माला आल्यावर सुरक्षित राहील का, याची चिंता त्यांना सतावत आहे, अशा भावना या सदस्यांनी व्यक्त केली.

उस जमाने की रावणमेभी शराफत थी

सतयुगमे अपहरण होने के बाद भी सीतामाई सुरक्षित थी, क्योंकी उस जमाने के रावणमेभी शराफत थी...अशी आपल्या भाषणाची सुरवात एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी केली. ते म्हणाले, काही लोक आपल्यामध्ये जातीय द्वेष पसरवीत आहेत.

आतंकवादी आणि अत्याचाऱ्यांना कोणती जात व धर्म नसते. त्यामुळे अशा घटनांतील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. अशा घटनांमध्ये राजकारण न करता कठुआच्या विषयासाठी प्राधान्यक्रम बदलण्याचा निर्णय घेतल्याने मी सत्ताधाऱ्यांचे अभिनंदन करतो, असेही खरादी यांनी सांगितले. 

Web Title: Political MIM Strong Over BJP in Solapur Corporation