कौलव मतदारसंघात राजकीय हालचाली वाढल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

शाहूनगर - राधानगरी तालुक्‍यातील नेतेमंडळींची मांदियाळी असणाऱ्या कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूकपूर्व राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गावागावांत संपर्क मोहीम राबवली आहे.

शाहूनगर - राधानगरी तालुक्‍यातील नेतेमंडळींची मांदियाळी असणाऱ्या कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूकपूर्व राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गावागावांत संपर्क मोहीम राबवली आहे.

या मतदारसंघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप आघाडी असा तिरंगी सामना होणार आहे. राष्ट्रवादीकडून संजय कलिकते व भाजप आघाडीकडून संदीप पोवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. कॉंग्रेसमधून राजेंद्र लोखंडे, अरुण पाटील, ऍड. बी. आर. पाटील, सलीम कोतवाल इच्छुक आहेत. यामध्ये कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या मतदारसंघात जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना यांचेही अस्तित्व आहे. त्यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. शिवाय गोकुळचे संचालक अरुण डोंगळे व भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांचा गट कोणती भूमिका घेणार, हेही महत्त्वाचे आहे. कौलव पंचायत समितीसाठी कॉंग्रेसचे नेते उदयसिंह पाटील- कौलवकर यांचे पुत्र रविश पाटील, (कै.) शंकर बाळा पाटील यांचे पुत्र सुशील पाटील, के. द. पाटील या कॉंग्रेसच्या इच्छुकांकडून; तर भरत डोंगळे व युवराज पाटील या राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडुन प्रचार सुरू झाला आहे. कसबा तारळे पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादीकडून दीपा पाटील व कॉंग्रेसकडून अस्मिता पाटील, डॉ. साधना हलके, नजमा बक्षू यांनी संपर्क दौरा सुरू केला आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या कृष्णराव किरुळकर, धैर्यशील पाटील- कौलवकर, उदयसिंह पाटील- कौलवकर, अरुण डोंगळे, सदाशिवराव चरापले, ऍड. अरुण सोनाळकर, वसंतराव पाटील या दिग्गज नेतेमंडळींच्या या मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Web Title: Political movements in Koulav seat