सांगलीत भरली संधिसाधूंची जत्रा

शेखर जोशी
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सांगली डॉट कॉम

सांगली डॉट कॉम

जे दिल्लीत ते गल्लीत अशी राजकारणाची सध्याची अवस्था आहे. जगात ओरिजनल काही नसते. पक्ष फक्‍त लेबल पुरते उरले आहेत. सर्व नेत्यांनी वैचारिकता हा पार्टच निवडणुकीपुरता सर्जरी करून काढून टाकला असावा. त्यामुळे सत्तालाभासाठी संधिसाधूंची जत्राच भरते आहे. आता त्यात दुफळ्या आणि कॉंग्रेस यांना वेगळे कधीच करता येत नाही आणि पतंगरावांना सांगायचे तर लोकांना त्याचे आश्‍चर्यही वाटत नाही. राष्ट्रवादी कोणाशी कशाप्रकारे कनेक्‍शन जोडेल याचे कोणतेही अनुमान काढता येत नाही. भाजपचा डोळा सर्व पक्षांतील उपयुक्‍तता असलेल्या वैफल्यग्रस्तांवर आहे. तरीही सर्व सामन्य जनतेने या संधिसाधूंच्या कुंभमेळ्यातून विकासाच्या गप्पा जरूर ऐकाव्यात आणि आरोपांची जुगलबंदी एन्जॉय करावी!

आपला देश बारमाही निवडणुकींचा आहे. तरीही आपली लोकशाही महान आहे. ग्रामपंचायत झाली की पंचायत, मग कुठली तरी सोसायटी मग दिल्लीसाठी, त्यानंतर राज्यासाठी, असे आपण दर वर्षा-सहा महिन्यांला लोकशाहीचा अधिकार बजावत असतो. नुकत्याच काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आटोपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा तापला आहे.

निवडणूकपूर्व रुसव्या-फुगव्यांचा, नाराजांचा आणि बंडखोरांचा खेळ सध्या सुरू आहे. अर्ज माघारीपर्यंत सर्व नेत्यांना हा शुगर आणि बीपी वाढविणारा असह्य खेळ सहन करावाच लागतो आणि त्यानंतर पुढील पाच वर्षे जे नेतृत्व मिळेल ते जनतेने सहन करावे लागते.. अर्थात जनतेने आपली मानसिकता तयार ठेवली आहे. जसे तासगावमध्ये काल परवापर्यंत डी. के. काका आणि संजयकाकांमधून विस्तव जात नव्हता. त्यांच्यातील "भाऊबंदकी'ही संपुष्टात आली. सुनील पाटील, सुभाष पाटील हे सारे आबांचे धारकरी आणि वारकरी आता काकांच्या नेतृत्वाखालचे नवे सरदार आणि मावळे म्हणून भूमिका बजावणार आहेत.

महसूल मंत्री चंद्रकांतदादांनी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपमध्ये अन्य पक्षातून भरपूर भरती केली आहे. आता सांगलीतील बॅकलॉगही भरला जात आहे. सारे काही उदंड आहे. हा सत्तेचा आणि काकांचा विजय आहे. पण ज्यांनी यांच्यासाठी डोकी फोडून घेतली त्यांनी याचा फार विचार न करता "जे जे होईल ते उगी उगी पाहावे' हा संत तुकारामांचा सल्ला मनाशी बांधून गप्प बसावे. तर कवी मंगेश पाडगावकरांनी जो उदासबोध सांगितला आहे. त्यानुसार ""मना सज्जना सत्ता पंथातच जावे.'' हे जे काही घडतंय ते फक्‍त सांगलीत आणि तासगावात घडत नाही तर आयाराम-गयारामांचा आणि संधिसांधूचा हा हंगामच असतो. मुंबई महापालिकेला तर कोणता कार्यकर्ता कोणत्या पक्षात गेला हे पाहायला बहुदा गुगल सर्चची मदत घ्यावी लागेल असे वाटते.

मुळात भाजप दोन खासदारावरून आज देशावर राज्य करतोय तो अन्य पक्षाकडून कार्यकर्त्यांचे भांडवल घेऊनच. पण काही असेना गेल्या जिल्हा परिषदेला फक्‍त दीड टक्‍का मते घेतलेला भाजप आजच्या घडीला सत्ता स्पर्धेतील प्रमुख खेळाडू आहे. भाजपला जिल्ह्यात बरे दिवस येताहेत. खासदार म्हणून संजय पाटील यांनी तासगाव नगरपालिका भाजपला मिळवून दिली आणि आता भाजपमध्ये इन्कमिंगही वाढवले आहे. याची दखल नेतृत्व घेईल. त्याखालोखाल आमदार शिवाजीराव नाईकांनीही शिराळ्यात भाजपमध्ये उत्साह आणला आहे. मिरज तालुक्‍यात कॉंग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहत असताना मात्र येथे सुरेश खाडे आणि जिल्हा नेतृत्वाच्या गळाला अजून फार मोठे मासे लागलेले नाहीत. पतंगराव कितीही सांगत असले की कॉंग्रेसमध्ये मतभेद नाहीत सारे काही गुण्या-गोविंदाने होते आहे तरी "ये पब्लिक है, ये सब जानती है....'

एरंडोली, कसबेडिग्रज, हरिपूर या सर्वच ठिकाणी झगडे आहेत. बाजार समिती आणि जिल्हा बॅंकेत जशा अनैसर्गिक कशाही आघाड्या झाल्या तशा येथेही होऊ शकतात. अगदी सारे काही अलबेल असतानाही विधान परिषद निवडणुकीत विशाल पाटलांच्या विरोधामुळे बराच घोळ चालला होता. आता पुन्हा विशाल पाटलांनी मिरज तालुक्‍याबाबत दंगा उठविल्याने पतंगरावांनी त्यांचा संबंधच काय असा सवाल केला आहे. मुंबईच्या बैठकीतही खानापूर, जत आणि मिरजेवरून घमासान झाले होते. अर्थात कॉंग्रेस जिल्ह्यातील मोठा पक्ष आहे. दुफळीचा हा शाप फार जुना आहे. सध्या दादा घराणे आणि कदम गट यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. पण ही लागण अन्य पक्षात सध्या नाही. याचे कारण बहुदा पतंगराव म्हणतात त्यात तथ्य आहे. अन्य पक्षांकडे म्हणजे विशेषत: भाजपला तर काही ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवारही मिळेनात. त्यामुळे जे अन्य पक्षात नाराज होताहेत त्यांचा मार्ग बीजेपीकडे किंवा अपक्ष म्हणून बंडाकडे जाणार यात शंका नाही.

हे असे कॉंग्रेसचे असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांच्या रयत विकास आघाडीने शनिवारी वाळवा- शिराळ्याची आपली यादी जाहीर केली आहे. राजू शेट्टींनीही यावेळी सराईत राजकारण्यासारखी आपली भूमिका घेतली आहे. एवढे दिवस कॉंग्रेस त्यांना शत्रू होती; पण आता राष्ट्रवादी सोडून कोणाशी आघाडी करणार असल्याचे सांगत त्यांनी तासगावांत मुळात जेथे कॉंग्रेस सर्वात "वीक' आहे. तेथे त्यांच्याशी आघाडी केली आहे. आता भाजपबरोबर सत्तेत राहून ते अशा काही गमती करत आहे. असेही ठरल्याची चर्चा आहे, की सदाभाऊंनी वाळवा-शिराळा पाहायचा आणि उर्वरित जिल्ह्यात शेट्टीच आघाडीचे निर्णय घेतील. सांगली बाजार समितीत असे प्रयोग यापूर्वीच स्वाभिमानीने केले आहेत.

राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहेच. मुळात असे म्हणतात, की राष्ट्रवादीच्या येथील नेत्यांनी कॉंग्रेसशी आघाडीबाबत खटपट केली; पण पतंगराव व मोहनरावांनी ती धुडकावून लावली. त्यानंतर जयंत पाटलांनी प्रत्येक तालुक्‍यातील कारभाऱ्यांना सोयीनुसार निर्णय घेण्याची मुभा दिली. त्याचा पहिला प्रयोग कडेगाव-पलूसमध्ये झाला तो देशमुख-लाड या केमिस्ट्रीतून, तर दुसरा प्रयोग आटपाडी-खानापुरात होतो आहे. तो राजेंद्रअण्णा आणि भाजप यांच्यातला. जत आणि कवठेमहांकाळातही असेच जादूचे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. या सर्वांतून करमणूक होईल. एक नक्‍की की जिल्हा परिषद हे जिल्ह्याच्या कोणत्या विकासाचे केंद्र उरले आहे हे देखील नेत्यांनी जाता-जाता स्पष्ट करावे, एवढीच जनतेची मागणी आहे.

Web Title: political opportunism in sangli