Vidhan Sabha 2019 : युवकांच्या शिरावर राजकारणाची धुरा! 

संजय मिस्कीन
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

विधानसभेच्या या वेळी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच पक्षांतून युवक चेहरे मोठ्या प्रमाणात राज्याच्या राजकारणावर आपली छबी उमटवण्याच्या तयारीत आहेत. प्रभावी वक्तृत्व, नेतृत्वगुण, व्यूहरचनात्मक चालीत माहीर अशी ही पिढी अभ्यासू आहे. त्यांच्याकडे जाणकारांसारखा बारकावाही असल्याचे जाणवते...

विधानसभा 2019 : 
विधानसभेच्या या वेळी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच पक्षांतून युवक चेहरे मोठ्या प्रमाणात राज्याच्या राजकारणावर आपली छबी उमटवण्याच्या तयारीत आहेत. प्रभावी वक्तृत्व, नेतृत्वगुण, व्यूहरचनात्मक चालीत माहीर अशी ही पिढी अभ्यासू आहे. त्यांच्याकडे जाणकारांसारखा बारकावाही असल्याचे जाणवते...

महाराष्ट्राच्या राजकारणात चाळीस-पन्नास वर्षे राजकारण करणारे अनेक नेते मुख्य राजकीय प्रवाहात असले, तरी युवा चेहरे सध्या राजकारणावर छाप पाडताना दिसत आहेत. प्रथमच विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांतील युवानेते आता प्रमुख नेत्यांच्या भूमिकेत आले आहेत. भविष्यात ‘लंबी रेस का घोडा’ होण्याची रंगीत तालीम म्हणून या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे. २५ ते पन्नासच्या वयोगटातील हे चेहरे नव्या राजकारणाची पायाभरणी करत आहेत.

भाजपकडे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरुण आहेत. ४५ व ५० दरम्यान त्यांचे वय असल्याने ते तरुण चेहराच मानले जातात. राजकारणात ५० हे वय तसे तरुणच मानले जाते. फडणवीस यांच्याशिवाय भाजपकडे पंकजा मुंडे या युवा महिला नेत्याने राज्याच्या राजकारणात आपली छाप पाडली आहे. पक्षावर मजबूत पकड करतानाच सामाजिक समीकरणांची घातलेली सांगड त्यांच्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवते. याशिवाय आशिष शेलार, डॉ. संजय कुटे हेदेखील राजकारणातले युवा चेहरे चमक दाखवत आहेत.

खऱ्या अर्थाने युवा चेहरे म्हणून शिवसेनेचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे राजीव सातव, सत्यजित तांबे; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे, रोहित पवार, पार्थ पवार यांच्याकडे नव्या युगाचे नवे राजकारणी म्हणून पाहिले जातेय. युवा सेनेचे आदित्य ठाकरे आता शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते बनले आहेत. आदित्योदय करण्यासाठी अख्खी शिवसेना कामाला लागली असून, राज्यभरात पहिल्यांदाच मुंबई सोडून त्यांनी झंझावाती प्रचार दौरे सुरू केले आहेत. संपूर्ण राज्य पिंजून काढताना आता शिवसेनेची सर्वस्वी धुरा त्यांनी खांद्यावर घेतली आहे. शिवसेनेच्या आक्रमक चौकटीत त्यांचे व्यक्तिमत्त्व बसत नाही. पण शांत व संयमी युवा चेहरा म्हणून ते सामान्य नागरिकांत मिसळत आहेत. 

सर्वच पक्षांपेक्षा राष्ट्रवादीकडे युवा आणि आक्रमक चेहऱ्यांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, धनंजय मुंडे आणि अमोल मिटकरी तुफान भाषणबाजी करून लोकांना खिळवून ठेवण्यात माहीर आहेत. वक्तृत्वशैलीत या तिघांनी सध्या बाजी मारली आहे; तर पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीचे रोहित पवार यांनी अल्पावधीत राज्याच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे. अभ्यासू युवा, शेती, माती, संस्कृतीसोबतच ग्रामविकास, सहकार, शिक्षणात रोहित यांचा दांडगा अभ्यास असल्याचे कोणी नाकारत नाही. पार्थ पवार यांचाही राजकारणात प्रवेश झालेला असला तरी संघटनात्मक रणनीती आखण्याकडे त्यांचा जास्त कल दिसतो. अमोल मिटकरी हा सामान्य घरातील युवा चेहरा सध्या राष्ट्रवादीचे व्यासपीठ गाजवत आहे. 

सत्यजित तांबे या युवा चेहऱ्याकडे काँग्रेसकडील कल्पक नेता म्हणून पाहिले जात आहे. युवक काँग्रेसला नवसंजीवनी देतानाच काँग्रेसला आक्रमक बनवण्यात तांबे यांचा वाटा मोठा आहे. प्रचार आणि प्रसारासोबत संघटना बांधणी व नव्या कल्पना लढवून आंदोलनाची दिशा आखण्यात तांबे यांचा वकूब आहे. 

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश व नीलेशदेखील नव्या राजकारणातील युवानेते आहेत. नीतेश उत्तम वक्ता तर आहेतच; पण प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करत त्यांनी विधानसभेत छाप पाडली आहे. मराठा आरक्षण मेळावे घेत नीतेश यांनी राज्यभरात कार्यकर्ता वर्ग उभा केला आहे. आता ते काँग्रेसचे आमदार असले तरी पुढे भाजपचे नेते म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करणार आहेत. 

याशिवाय, वंचित बहुजन आघाडीत सुजात आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटातील सचिन खरात हे युवा चेहरेदेखील मोठ्या ताकदीने पुढे येत आहेत. सुजात आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद व सोलापूरच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. सचिन खरात या युवा चेहऱ्याकडे दलित चळवळीतला वैचारिक बांधणी मजबूत असलेला नेता म्हणून पाहिले जाते. आक्रमक वक्तृत्व व उत्तम मांडणी या सचिन खरात यांच्या जमेच्या बाजू आहेत. सध्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सचिन राजकारणात छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एकंदर यंदाची लोकसभा निवडणूक पहिल्यांदाच युवा नेत्यांभोवती फिरणार आहे. यातून राज्याच्या राजकारणात भविष्यातील मजबूत नेता कोण, यावर मोहोर उमटवणारी निवडणूक म्हणून या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political responsibility on youth