राजकीय पटलावर महत्त्वाचे चेहरे; मिरजेत 'धक्कातंत्र'मुळे सारे सावध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political news

मिरज तालुक्याला राजकीय तिरक्या चालींची सवय झाली आहे.

राजकीय पटलावर महत्त्वाचे चेहरे; मिरजेत 'धक्कातंत्र'मुळे सारे सावध

मिरज : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मिरज तालुक्यातील राजकीय पटलावरील महत्त्वाचे चेहरे लढत देत आहेत. गेल्या निवडणुकीतील धक्कातंत्र पाहता सारेच प्रचंड सावध आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे चेहरे यात असल्याने त्यांच्यासाठी ही कसोटी महत्त्वाची असणार आहे. मिरज तालुक्याला राजकीय तिरक्या चालींची सवय झाली आहे. या निवडणुकीतही काही चाली तशाच आखल्या गेल्या आहेत. त्या किती यशस्वी होतात, हे निकालावेळी कळेल. जिल्ह्यात वाळव्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मतदार संख्या मिरज तालुक्याची असल्याने महत्त्व सहाजिकच वाढले आहे.

लोकसभा लढलेले विशाल पाटील, विधानसभा लढलेले पृथ्वीराज पाटील आणि बाळासाहेब होनमोरे, काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्री पाटील, भाजपच्या माजी महापौर संगीता खोत, मजूर संस्था गटाचे नेते सुनील ताटे आणि विशाल यांच्या विरोधात लढत देणारे उमेश पाटील अशी महत्त्वाची नावे नशीब आजमावत आहेत. यात कुणी कुणाला कमी लेखण्याची चूक नक्कीच करणार नाही, कारण गेल्या निवडणुकीत या तालुक्यात मदनभाऊंचा झालेला पराभव हा सहकारी संस्था निवडणुकीत मतदारांना गृहीत धरू नका, असा संदेश देणाराच होता.

हेही वाचा: ना रुकेंगे ना थमेंगे...; NCB च्या कारवाईवरून क्रांतीचं नवं ट्विट

विशाल पाटील यांच्याविरोधात धामणीच्या सुरेश पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. ऐनवेळी सूत्रे फिरली आणि सुरेश पाटील यांनी रिंगणातून माघार घेतली. परिणामी खासदार संजय पाटील समर्थक उमेश पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. उमेश कार्यकर्ता म्हणून प्रभावी आहेत, ते विशाल यांना कशी टक्कर देतात, संजयकाका काही पत्ते ओपन करतात का, याकडे लक्ष असेल. इथे ‘घरभेदी’चा धोकाही संभवतो, अशी चर्चा आहे.

या निवडणुकीतील सहकार विकास पॅनेलची एकूण मतांची बेरीज पाहता जयश्री पाटील, बाळासाहेब होनमोरे यांच्यासाठी मार्ग सुकर ठरेल, अशी शक्यता आहे. परंतु, गेल्या काही काळातील अनुभव पाहता राजकीय वातावरण गृहीत धरण्याची चूक ते करणार नाहीत. पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी आव्हान तगडे आहे. बँक-पतसंस्था गटात त्यांच्यासोबत किरण लाड आहेत, तर विरोधात राहुल महाडिक आणि अजित चव्हाण तसेच अपक्ष किशोर पाटील यांचे आव्हान आहे. हा गट वरवर पाहून चालत नाही, आतील खेळी रंजक असतात.

हेही वाचा: काँग्रेसनं इतर कोणालाही दिलं नाही स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय - चौहान

भटक्या विमुक्त गटातून भाजपचे युवा नेते परशुराम नागरगोजे नशीब आजमावत आहेत. त्यांची चिमण डांगे यांच्याशी टक्कर आहे. मिरज तालुक्यात दोन्ही आमदार भाजपचे आहेत, जिल्हा परिषदेत सत्ता आहे, आता सहकारी संस्थांत भाजपसाठी नवे आव्हान आहे. या निवडणुकीत भाजपचे नेते याआधीचे पक्के खेळाडू असले तरी गणिते नवी आहेत. याशिवाय, तालुक्यातून नितीन काळे, विलास बेले, कल्लू कामत, रमेश साबळे असे नवे खेळाडू रिंगणात आहेत. त्यांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. बाजार समितीचे संचालक मुजीर जांभळीकर, भाजपचे सुयोग सुतार यांचीही उमेदवारी आहे. पैकी जांभळीकर यांनी मैदानातून माघार घेत पाठिंबाची घोषणा केली आहे.

loading image
go to top