कऱ्हाडला गुंडांच्या टोळ्यांना राजकीय बळ

सचिन शिंदे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

शहरातील गुंडगिरीची पाळेमुळे आता ग्रामीण भागातही रुजू लागली आहेत. भाई, काका, बाबा, मामा, आबाच्या नावाखाली चालणाऱ्या गुंडगिरीला वेळीच आवरण्याची गरज आहे. 

कऱ्हाड ः राजकीय वरदहस्तासह कारवाईत होणाऱ्या हस्तक्षेपामुळे कऱ्हाडच्या गुंडगिरीला बळ मिळते आहे. शहरात वाढणाऱ्या गुंडगिरीला पडद्यामागून बऱ्याच राजकीय लोकांचे पाठबळ मिळताना दिसत आहे. पक्षीय पातळीसह नेत्यामंध्ये राजकीय गुंड विभागले गेले आहेत. त्यामुळे शहरातील गुंडगिरीची पाळेमुळे आता ग्रामीण भागातही रुजू लागली आहेत. भाई, काका, बाबा, मामा, आबाच्या नावाखाली चालणाऱ्या गुंडगिरीला वेळीच आवरण्याची गरज आहे. 

कऱ्हाडला काही महिन्यांपूर्वी एक धुमश्‍चक्री झाली. त्या काळाताच संबंधित टोळीला मोका लावण्याची पोलिसांनी तयारी केली होती. तशी तयारी होत आहे, याची संबंधित गुंडांना कानकून लागली, की त्यांनी थेट एका बड्या राजकीय हस्तीकडून ते प्रयत्न थांबवले गेले. पूर्वी गुंडांना सन्मान देणाऱ्या राजकीय व्यक्तीच्या दबावाला न जुमानता काम करणारे अधिकारीही त्यांचा तोच अनुभव सांगताहेत. काही राजकीय लोक नाहक गुंड प्रवृत्तींना थारा देत आहेत, अर्थात त्या काळापासून गुंडांनाही बरोबर ठेवण्याची किंवा त्यांच्या संपर्कात राहण्याची जणू रीतच पडल्यासारखी स्थिती येथे दिसते आहे. गुंड प्रवृत्तीला मोका लावण्याची पोलिसांनी तयार केली होती, त्यांना रोखणाऱ्या बड्या नेत्यांमुळे पुढे गोळीबारासारखा प्रकार घडल्याचे फलित पाहावयास मिळत आहे. 
कऱ्हाडमध्ये जेवढे परवानाधारक बंदुकधारी आहेत. त्या सगळ्यांना शिफारशी देण्यामध्ये अनेक मोठ्या राजकीय लोकांचा हात आहे. शिफारशी थेट जातात, अर्थात त्याची चर्चा होत नाही किंबहुना त्याची माहिती कोणाला दिली जात नाही. निम्म्या लोकांना बंदूक परवाना द्यावा, अशा शिफारशी आमदारांसारख्यांनी दिल्या आहेत. वास्तविक ज्याने बंदुकीचा परवाना मागितला आहे, त्यांना त्याची किती गरज आहे, हे पाहून त्या शिफारशी गेल्या पाहिजेत. मात्र, तसे न करता केवळ मतांचा आणि वैयक्तिक संबंधांचा विचार करून दिल्या जाणाऱ्या शिफारशी अधिक धोकादायक आहेत. 

गुंडांच्या टोळ्यांना पैसा आणि कारवाई न होण्याचे मिळणारे पाठबळ त्यांची ताकद वाढविताना दिसते आहे. गुंडांच्या टोळ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी वास्तविक सर्वपक्षीय राजकीय लोकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. मात्र, येथे नेमकी उलटी स्थिती आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते. ती थांबवायची असेल, तर कारवाईत होणारा राजकीय हस्तेक्षेप व दबाव थांबलाच पाहिजे. 

मी आमूक नेत्याचा... 

गुंडाचे फ्लेक्‍स लागणार नाहीत, यासाठी पोलिस व पालिका आता आक्रमक झाले आहेत. ती चांगली व सकारात्मक गोष्ट आहे. मात्र, मधल्या काही काळात शहरासह ग्रामीण भागात आमचे दैवत किंवा आमचे काळीज म्हणून झळकणाऱ्या गुंडांच्या फ्लेक्‍सवर अनेक नेत्यांचेही फोटो होतो. त्यावर काही लोकांना हरकत घेतली. त्या वेळी पोलिसांनी ते फ्लेक्‍स काढा, असे सांगताचा आम्ही आमूक नेत्याचे कार्यकर्ते आहोत... असा सज्जड दम देऊन ते फ्लेक्‍स काढण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर पुढे काहीही कारवाई झाली नाही. उलट ते फ्लेक्‍स अधिकृत शुल्क भरून लागले होते, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, आता तरी ती स्थिती बदलेले, अशी अपेक्षा आहे. 

वस्तुस्थितीवर एक नजर... 

वर्चस्ववादाचे समाजस्वास्थ्यावर असतानाही गुंडांना मिळणारे पाठबळ घातक 
टोळ्यांवर कारवाईचे पोलिसांचे प्रयत्नालाही राजकीय बाधा 
राजकीय व्यक्तींच्या दबावाला न जुमानता काम करण्याची गरज 
बंदुकीसाठी शिफारशी देणाऱ्या राजकीय लोकांचीही चर्चा 
पैसा आणि कारवाई न होण्याचे मिळणारे पाठबळ गुंडांची ताकद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politician supports criminals in karad