शेतकऱ्यांच्या वेदनेतही सुचलेय राजकारण...!

विठ्ठल लांडगे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

दुर्दैवाने लोकप्रतिनिधींच्या या दौऱ्यातही राजकारण सुरू झाले आहे. दौऱ्यात सहभागी होण्याच्या मुद्यावर भाजप व शिवसेनेत अंतर्गत कलह पेटला आहे. शेतकऱ्यांचे जीवनच वेदनादायी झालेले असताना राजकीय पक्षांना त्यातही सुचलेले राजकारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. काही भागात उभी पिके सडली. राहुरीसारख्या भागात उभी पिके शेतजमिनीसह पाण्यासोबत वाहून गेली. झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे. अशावेळी स्थानिक खासदार व नवनियुक्त आमदारही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पुढे आले आहेत.

मात्र, दुर्दैवाने लोकप्रतिनिधींच्या या दौऱ्यातही राजकारण सुरू झाले आहे. दौऱ्यात सहभागी होण्याच्या मुद्यावर भाजप व शिवसेनेत अंतर्गत कलह पेटला आहे. शेतकऱ्यांचे जीवनच वेदनादायी झालेले असताना राजकीय पक्षांना त्यातही सुचलेले राजकारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका सुरू झाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाच्या राजकारणाचा कुणाला फटका बसला, यावर मंथन सुरू आहे. त्यातही पाडापाडीच्या या राजकारणात जिल्ह्यातील भाजपतच दोन गट पडल्याचे दिसते. त्यात शिवसेनेने उडी घेतली असून, भाजपच्या एका गटाला त्यांच्याकडून विरोध सुरू झाला आहे. मात्र, पक्षांतर्गत असलेले या रुसव्याफुगव्यांचा त्रास शेतकऱ्यांना व्हायला नको होता, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भाजप नेते व नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल पारनेर तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी भाळवणीपासून सुरवात केली. विखे यांच्या दौऱ्याकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने पाठ फिरवली. त्यामुळे पारनेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहिष्कार का व कोणाच्या आदेशाने घातला असावा, याची चर्चा रंगली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासदार विखे यांनी नगर तालुक्‍यातील काही भागांचा दौरा केला. त्या वेळी नगर तालुक्‍यातील महायुतीच्याच काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. हेच लोण जिल्ह्यातील अन्य काही भागात पोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष्य देण्याऐवजी पक्षांतर्गत सुरू असलेल्या या वादाचीच जास्त चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. हा राजकीय श्रेयवाद शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसायला नको, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

महिनाअखेर नुकसान भरपाई जमा होणार
पारनेर तालुक्‍यातील शंभर टक्के शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. त्याचे सरसकट पंचनामे करावेत, असा आदेश खासदार सुजय विखे पाटील यांनी काल दुपारनंतर पारनेरच्या महसूल अधिकाऱ्यांना दिला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर अनुदानासह भरपाई रक्कम नोव्हेंबरअखेर जमा होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पावसामुळे विखे यांनी पारनेर तालुक्‍यात नुकसान पाहणी दौरा केला. त्या वेळी ते बोलत होते. भाळवणी, वासुंदे, कर्जुले हर्या, वडनेर, निघोज, जवळे, वाडेगव्हाण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे, सुभाष दुधाडे, बाबासाहेब खिलारी, रमेश काथोटे, किशोर माने, रामदास दरेकर आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, ""विरोधी पक्षाच्या मागणीपेक्षा आमचे सरकार जास्त प्रमाणात नुकसान भरपाई देणार आहे. राज्य सरकारने दहा हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. माझा नगर जिल्ह्यातील हा चौथा दिवस आहे. खरीप व रब्बी हंगामातील सोयाबीन, बाजरी, कांदा, ज्वारी, तुरीसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे प्रत्येकाला मदत मिळणे गरजेचे आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागानुसार बैठका घेऊ.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics even in the pain of peasants