तात्यांचा चष्मा अन्‌ अध्यक्षाच्या खुर्चीला नंबर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

सांगली - ‘फेसबुक’वरील चार ओळींनी विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला संकटात आणणारे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि त्यांचे नेते, आमदार जयंत पाटील यांच्यात बिनसलयं, अशा शंका व्यक्‍त होत होत्या. जिल्हा बॅंकेतील एका कार्यक्रमात या शंका दूर सारत दिलीप पाटील यांनी जयंतरावांच्या नेतृत्वाचे कौतुक केले, सोबत मुहूर्तावर नव्या खुर्चीत बसत असल्याने ती शाबूत राहील, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली. अर्थात, जयंतरावांनी थेट उत्तर दिले नाही. ‘दिलीपतात्यांचा चष्मा जयंतरावांना बसला’ अन्‌ दोघे आजही एका चष्म्यातूनच बघतात, याची शब्दांविना प्रचिती आली. 

जिल्हा बॅंकेच्या दुसऱ्या मजल्याच्या नूतनीकरणाचे उद्‌घाटन जयंतरावांच्या हस्ते आज पार पडले. योगायोग असा, की बॅंकेचे अध्यक्ष इस्लामपूरचे... उद्‌घाटन करणारे नेते इस्लामपूरचे अन्‌ त्यात भरीस भर म्हणून भटजीपण इस्लामपूरचाच. तोही तात्यांनी आणलेला. त्यामुळे तात्यांचे ग्रह बलवान करणारे मंत्रोच्चार झाले नसतील तर नवल..! आता तात्यांनी भटजींना दक्षिणा दिली तीही ‘पे’ म्हणजे मोबाइल ॲपवरून. त्यामुळे सारे कसे पारदर्शी झाले. त्यात दिलीपतात्यांनी अनेकांना चिमटे घेतले, तर साहेबांवर कौतुकसुमनांची वृष्टी केली. चाळीस वर्षांनंतर जिल्हा बॅंकेत आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करताना, ‘‘साहेबांनी मला इकडं येऊच दिलं नव्हतं, हे इतर लोकांचे कार्यक्षेत्र आहे, असं सांगायचे,’’ याची आठवण करून दिली. त्यावेळी विलासराव शिंदे, बी. के. पाटील यांनी हलके स्मित केले. ‘‘गेल्या वर्षभरात बॅंकेत भानगडी केल्या नाहीत’’, यावर जोर देताना ‘‘गेल्या काळात काही झाल्या असतील त्या असतील’’, असे सांगत चिमटा काढला. इतके बोलून थांबतील ते तात्या कसले... ‘‘मुहूर्तावर नव्या खुर्चीत मी बसतोय, त्यामुळे कुठल्या प्रकारचा गोंधळ होणार नाही’’, अशी अपेक्षा व्यक्त करत या ना त्या कारणाने खुर्चीखाली बाँब पेरणाऱ्यांना त्यांनी ‘साहेबांसमोर’ दमात घेतलं. 
जयंतराव यावर काय बोलतात, याकडे अर्थातच ‘खुर्चीला नंबर’ असलेल्यांचे लक्ष होते. परंतु, जयंतरावांनी थेट मोदींवर हल्ला चढवला आणि त्यावरच चर्चा केंद्रित केली. दोन हजार रुपयांची नोट मागून घेतली. प्रभारी व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब रामदुर्ग यांनी नोट दिली, नोटेवरील गव्हर्नरचे वचन वाचण्याचे ते प्रयत्न करू लागले. दिलीपतात्यांनी आपला चष्मा दिला, त्यावर जयंतराव म्हणाले, ‘‘दिलीपतात्यांचा चष्मा मला बसतो’’, या वाक्‍याने टाळ्यांचा कडकडाट झाला. चष्म्याचा नंबर जुळला असला तरी खुर्चीच्या नंबरात अनेकजण आहेत!

विशाल पाटील बॅंक फोडा...
जिल्हा बॅंकेच्या दुसऱ्या मजल्यावर पोचल्यानंतर जयंतरावांनी आदबीने नमस्कार करत वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची चौकशी केली. मुख्य सोहळ्यात दिलीप पाटील यांनी विशाल यांच्यावर कोटी करताना ‘‘आम्ही स्टेट बॅंक फोडणार आहोत. वसंतदादांनी जेल फोडला, धुळ्याचा खजिना लुटला, आता त्यांचा नातू स्टेट बॅंक फोडायला आम्ही पुढे केला आहे. त्याला सांगितलयं, दे धडक म्हणून.’’ तात्यांच्या या वाक्‍यावर जयंतरावांनी टेबलावर हात आपटत आनंद लुटला.

Web Title: politics in islampur