इस्लामपूर पालिकेचे राजकारण तापत जाणार

धर्मवीर पाटील
Friday, 25 December 2020

इस्लामपूर : शहरातील सुमारे तीस कोटी रुपये खर्चाच्या भाजी मंडई आणि वाहनतळाचा विषय काहीही करून पुढे ढकलण्याच्या राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर विकास आघाडीने 'पाणी' फिरवले.

इस्लामपूर : शहरातील सुमारे तीस कोटी रुपये खर्चाच्या भाजी मंडई आणि वाहनतळाचा विषय काहीही करून पुढे ढकलण्याच्या राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर विकास आघाडीने 'पाणी' फिरवले. यात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जी काही राजकीय समीकरणे निर्माण होऊ पाहत आहेत, त्याचेच हे निदर्शक असल्याचे दिसत आहे. यापुढे पालिकेचे राजकारण तापत जाण्याचीच ही चिन्हे आहेत. 

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका संपताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन बैठका घेतल्या, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी शहरातील घरपट्टी करवाढीचा विषय राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना हाती घ्यावा लागला. 

त्यावरूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर झालेली पालिकेची सर्वसाधारण सभा गाजली ती निधीच्या वाटपावरून. त्यातही दोन्ही गटात बराच गोंधळ झाला. त्यातीलच एका विषयावर विशेष सभा घ्यावी लागली आणि त्यात मात्र नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बाजी मारत विषय 'त्यांच्या पद्धतीने' सोडवला. काहीही करून आधी आलेले दोन कोटी आणि नंतरचे भाजी मंडईच्या कामासाठी वर्ग करावयाचे साडेचार कोटी थांबवून ते इतर कामांकडे वळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, तो नगराध्यक्ष पाटील यांनी आघाडीतील अन्य साथीदारांच्या मदतीने हाणून पाडला. या विषयाला 'श्रेयवादाची' किनार होती आणि ती स्पष्टपणे जाणवत होती. 

आणखी काही दिवस हा विषय पुढे ढकलायचा, पालिकेच्या निवडणुकीत त्याचे राजकारण करायचे किंवा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून निधी आणून त्याचे 'क्रेडिट' घ्यायचे अशा अनेक बाजू त्याला होत्या. किंबहुना या कामाच्या प्रारंभाचे श्रेय विकास आघाडीला मिळू द्यायचे नाही, अशीही एक भूमिका त्यामागे होती. ऐन निवडणुकीत काय होईल हे त्यावेळीच ठरेल; पण त्यासाठी तूर्तास भाजी मंडई आणि वाहनतळाचा विषय 'प्रतिष्ठेचा' बनला होता. नगराध्यक्षांनी विशेषाधिकार वापरत तो निकाली काढला आहे आणि राष्ट्रवादीच्या आव्हानाला त्यांनी थेट कोर्टात जाण्याची सूचना केली आहे. 

भाऊ-दादा एकत्र! 
नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यातील "सख्य' शहर जाणून आहे. एकाच आघाडीत महत्त्वाचे घटक असूनही ते दोघे याआधीच्या सभांमध्ये एकमेकांच्या विरोधात अनेकदा भांडले आहेत; मात्र भाजी मंडईच्या विषयावर या दोघांची भूमिका एकच होती. ही एकी आगामी काळात किती टिकून राहाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल! 

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या भाजी मंडईचा ठराव जुना होता, त्यावेळी त्याला सर्वांची संमती होती आणि आता सहज निधी उपलब्ध असताना त्याला विरोध करण्याची भूमिका दुर्दैवी आहे. 
- नगराध्यक्ष निशिकांत पाटील. 

आमचा मंडईला विरोध नव्हता. अपुऱ्या निधीत काम सुरू करण्याला आक्षेप होता. अपुऱ्या निधीमुळे भविष्यात काम थांबल्यास नागरिकांनाच हाल सोसावे लागतील. 
- शहाजी पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The politics of Islampur Municipality will heat up