उशिरा बोलले; पण मुश्रीफ खरे बोलले

उशिरा बोलले; पण मुश्रीफ खरे बोलले

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी आपल्याच पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांच्या भूमिकेवर नाराज होत ‘आपण कोणत्या पक्षाचे आहात एकदा स्वत:च जाहीर करा’, असे थेट आव्हानच दिले. या घटनेला १२ तास पूर्ण होण्याअगोदरच खासदार धनंजय महाडिक यांची छबी भाजपच्या विजयी उमेदवारांच्या जाहिरातींमध्ये झळकू लागली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच ‘साहेब खरे बोलले; पण उशिरा बोलले’, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

भाजपची लाट असताना आणि सर्वत्र काँग्रेसचे पानिपत होत असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मात्र राष्ट्रवादीतून धनंजय महाडिक निवडून आले. यामध्ये त्यांचे स्वत:चे कर्तृत्व आहेच; पण राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचेही योगदान त्यांना नाकारता येणार नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कोल्हापूर जिल्हा या पक्षाच्या पाठीशी राहिला. तेव्हा पक्षाचे नेतृत्व सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे होते. मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात बिनसल्यानंतर त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. याचे शल्य आमदार मुश्रीफ यांना होते. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली. यामध्ये कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. लोकसभेचा उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडेच लोक पाहू लागले. मात्र त्याला ते तयार नव्हते. संभाजीराजे यांनी पराभवानंतर राजकारणातून अंग काढून घेतले. 

त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता होती. कारण धनंजय महाडिक यांना तशी अन्य पक्षांतून उमेदवारीची ऑफर होती. त्यांनी ती नाकारत अखेर राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली.

राष्ट्रवादीची उमेदवारी धनंजय महाडिक यांना निश्‍चित झाल्यानंतर त्यांच्या विजयासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी सर्व ताकद पणाला लावली. या काळात महाडिक व आमदार सतेज पाटील यांचे संबंध खूप टोकाला गेले होते. आमदार पाटील यांनीही जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार पाटील आपल्यासोबत असणे आवश्‍यक आहे, असे आमदार मुश्रीफ यांना वाटू लागले. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. परंतु, निवडून आल्यानंतर धनंजय महाडिक यांनी मात्र या सर्वांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपले चिरंजीव अमल महाडिक यांनाच ‘दक्षिण’मधून उतरविले. त्यामुळे धनंजय महाडिक यांची अडचण झाली. भाऊच मैदानात उतरल्यामुळे त्यांना भाजपसोबत राहावे लागले. कौटुंबिक अडचण म्हणून आमदार मुश्रीफ यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बहुतेक सर्व प्रभागांतून उमेदवार उभे केले होते. लोकसभा निवडणूक झाली तेव्हा महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती. त्यामुळे खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी सर्व नगरसेवकांना आमदार मुश्रीफ यांनी प्रचार करण्याचे आदेश दिले होते. परंतु, दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही खासदार महाडिक यांनी पक्षाच्या बाजूने काम केले नाही. त्या वेळी त्यांनी शहरातील सर्वच कार्यकर्त्यांनी मला मदत केली असल्यामुळे आपण महापालिकेच्या निवडणुकीत अलिप्त राहणार असल्याची भूमिका घेतली. त्या वेळीही आमदार मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीतही श्री. मुश्रीफ यांना खासदार महाडिक यांचा असाच अनुभव आला. खासदार महाडिक यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर होता.

दरम्यान, जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र खासदार महाडिक यांनी आपण जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत कार्यक्रमाला खासदार महाडिक उपस्थितही होते. याठिकाणीच आमदार मुश्रीफ आणि खासदार महाडिक यांच्यात दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेला कोणाला पाठिंबा द्यायचा, यावरून संघर्षाची ठिणगी पडली. खासदार महाडिक यांनी कागलच्या राजकारणाचा संदर्भ देत ‘दक्षिण’मध्ये भाजपसोबत आघाडी करावी, असे मत व्यक्‍त केले. त्याला विरोध करत आमदार मुश्रीफ यांनी ‘दक्षिण’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहील, असे जाहीर केले. ‘दक्षिण’मध्ये आमदार सतेज पाटील यांचे उमेदवार होते. त्यामुळे त्याला खासदार महाडिक यांची मान्यता असणे शक्‍यच नव्हते.  
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला गेल्या वेळ इतक्‍याही जागा राखता आल्या नाहीत. काही जागा त्यांच्या अतिशय कमी मताने पडल्या. खासदार महाडिक यांनी या निवडणुकीतही राष्ट्रवादीकडे पाठच फिरविली. राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार असलेल्या काही ठिकाणी खासदार महाडिक यांनी त्यांच्याविरोधातच जोडण्या लावल्या. त्यामुळे आमदार मुश्रीफ यांना राग येणे स्वाभाविक आहे. यापूर्वी झालेल्या घटनांबाबत आमदार मुश्रीफ यांनी कधीही तक्रार केली नव्हती. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण दिले जायचे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मात्र खासदार महाडिक यांच्याबाबतीत गेल्या तीन वर्षांपासून जाणीवपूर्वक पाळलेले मौन त्यांनी सोडले. त्यांनी खासदार महाडिक यांना पक्षाबाबत भूमिका जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे.

भाजपच्या जाहिरातींवर खासदार महाडिक
मुश्रीफ यांनी आव्हान करून बारा तास होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे फोटो मार्गदर्शक म्हणून भाजपच्या विजयी उमेदवारांनी केलेल्या जाहिरातींमध्ये झळकू लागले आहेत. त्याची उलटसुलट चर्चा सुरू असून खासदार महाडिक नेमके कोणाचे, असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com