‘मनोमिलन एक्‍स्प्रेस’ धावणार की थांबणार...

Prithviraj-and-Udaysinh
Prithviraj-and-Udaysinh

कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणसह जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या काँग्रेस पक्षांतर्गत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे मनोमिलन झाले.

मलकापूरसह ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर त्याचा प्रभाव दिसलाही; पण सध्या बाबा आणि काका गटाची निघालेली ‘मनोमिलन एक्‍स्प्रेस’ला ब्रेक लागणार, की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
मलाकपूरसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोबत घेतलेल्या उंडाळकर गटाला येथे झालेल्या मेळाव्यापासून दूर ठेवले गेले. त्यामागचे नेमके राजकारण अद्याप गुलदस्त्यात असले, तरी ते कारण मनोमिलनाला धोकादायक ठरू शकते. जिल्हा काँग्रेस समितीच्या मेळाव्याचे निमंत्रणच मिळाले नसताना आम्ही तिकडे फिरकणे योग्य नाही, असा खुलासा उंडाळकर गटाकडून होत आहे, तर मनोमिलनाचा स्वीकार करण्याचा सर्वस्वी निर्णय पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असल्याने त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

कऱ्हाड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या गटाभोवती भाजपच्या रणनीतीने आखलेला फास अधिकाधिक आवळत असतानाच त्यांच्या मदतीला माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांचा गट धावून आला. नुकत्याच झालेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत उंडाळकर गटाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी विनाअट मनोहर शिंदे म्हणजेच काँग्रेसच्या प्रचारात उडी घेतली होती. जागा वाटपातही कोणतेही आडेवेढे घेतले गेले नाहीत. त्यामुळे उंडाळकर गट मलकापुरात असल्याची जाणीव साऱ्यांनाच निवडणूक निकालात दिसली. उंडाळकर गटाला स्वीकृत नगरसेवक पदाची ऑफर देऊन शिंदे यांनीही समतोल साधला. मलकापुरात उंडाळकर गटाचे काही खंदे समर्थक भाजपच्या गळाला लागले असतानाही आगाशिवनगरसह मलकापूरच्या विखुरलेल्या पट्ट्यात उंडाळकर गटाचा करिष्मा दिसला. त्यांची साथ असल्याने काँग्रेसला बहुमत मिळालेच.

त्याशिवाय बाबा व काका गटाच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तबही झाले. अत्यंत सामंजस्य पद्धतीने झालेले मनोमिलन, त्यानंतर झालेल्या जाहीर सभा, विजयी उमेदवारांचा कौतुक सोहळा अशा सगळ्या घटनांवर नजर टाकल्यास मनोमिलन यशस्वी झाल्यासारखी स्थिती होती.

मात्र त्यानंतर होणाऱ्या आरोप प्रत्योरापासून उंडाळकर गट अलिप्तच राहिला. बाबा गटावर आरोप झाल्यानंतर उंडाळकर गटाने काही रिप्लायही दिले नाहीत. 

भाजपचे अतुल भोसले यांना वेगळ्या पद्धतीने आरोपांची सरबत्ती केली. त्याला प्रत्युत्तरही दिले गेले; पण यामध्ये उंडाळकर गट शांत होता. अर्थात तो शांत राहणेच अपेक्षित होते. मात्र नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यापासूनही काका गट अलिप्त राहिला. त्यामुळे पुन्हा बाबा व काका गटामध्ये अंतर पडल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याची कुजबूज पुन्हा सुरू झाली आहे. 

काँग्रेसी मेळाव्याला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी होते. त्यांनी राष्ट्रवादीला निशाणा केला; पण एकाही पदाधिकाऱ्याने काका गटावर शरसंधान साधले नाही, तरीही या मेळाव्याचे निमंत्रण काका गटाच्या कोणत्याच पहिल्या किंवा दुसऱ्या फळीतील नेत्याला दिले गेले नाही, हे विशेष ठरले आहे. बाबा व काका गटाने एकत्र आले पाहिजे, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. त्याबाबत आमची काहीच हरकत नाही. तो निर्णय सर्वस्वी पृथ्वीराज चव्हाण घेतील, असेही त्यांनी सुचवले होते. त्याप्रमाणे उंडाळकर गटाने मनोलिनासाठी पाऊल पुढे टाकले आहे. त्यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनाच निर्णय घ्यावा लागणार असून, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या मेळाव्याचे निमंत्रण मिळाले नाही. ते मिळायला हवे होते. आम्ही अजूनही काँग्रेसचेच आहोत, याची जाणीव काही लोकांना पाहिजे. आम्ही मनोमिलनासाठी पाऊल टाकले आहे. प्रांतिक काँग्रेसनेही त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मनोमिलनाचा निर्णय आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाच घ्यावा लागेल. कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. त्यामुळे त्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे.
- ॲड. उदयसिंह पाटील, उंडाळकर गटाचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com