वर्चस्व अबाधित राखत सत्तेची परंपरा कायम राखू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

कोरेगाव पंचायत समितीची सत्ता आजवर काँग्रेसच्याच ताब्यात राहिली असून, येत्या निवडणुकीतही ही परंपरा कायम राखण्यासाठी तालुक्‍यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. 

कोरेगाव पंचायत समितीची सत्ता आजवर काँग्रेसच्याच ताब्यात राहिली असून, येत्या निवडणुकीतही ही परंपरा कायम राखण्यासाठी तालुक्‍यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. 

तालुक्‍यामध्ये काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला आहे. गावोगावी, वाडी- वस्तीवर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. संघटनात्मक बांधणीच्या ताकदीवर पंचायत समितीमध्ये आजवर पक्षाची सत्ता राहिली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी चिठ्ठीवर ‘राष्ट्रवादी’कडे सभापती गेल्याचा अपवाद वगळता आजवरच्या काळात पंचायत समितीवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. येत्या निवडणुकीत ही परंपरा कायम राखण्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक जागा पक्षाला मिळवून देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. सर्वसामान्य जनतेतून येणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याचे पक्षाचे धोरण या निवडणुकीतही कटाक्षाने पाळले जाणार आहे.

त्यासाठी काम करणारा व निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार, असे निकष पक्षाने ठरवले आहेत. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व विद्यमान लोकप्रतिनिधींनी केवळ आश्‍वासने देऊन जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. प्रत्यक्ष विकासाच्या नावाने ठणठणाटच आहे.

एकूणच तालुक्‍याची संस्कृती बिघडवण्याचे काम मात्र त्यांच्याकडून चोखपणे बजावले जात आहे. त्याचा प्रत्यय यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये जनतेला आलाच आहे. त्यामुळे पूर्वीचा सुसंस्कृत तालुका, अशी कोरेगाव तालुक्‍याची ओळख निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. त्यासाठी या निवडणुकीचा माध्यम म्हणून उपयोग करून घेऊन संपूर्ण तालुका पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसजन झटत आहेत. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हद्दपार करून पंचायत समितीवरील सत्ता कायम राखण्याचे उद्दिष्ट काँग्रेसने ठेवले आहे. 
- किशोर बाचल, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

पंचायत समितीवर ‘राष्ट्रवादी’चा झेंडा फडकवू
‘रा ष्ट्रवादी‘कडे असलेली इच्छुकांची मोठ्या प्रमाणातील संख्या हे पक्षाच्या लोकप्रियतेचे द्योतक असून, जिल्हा परिषदेच्या तालुक्‍यातील सर्व जागा जिंकून कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते झटत आहेत.

‘राष्ट्रवादी’ची नाळ सामान्य जनतेशी जोडली गेली आहे. त्यामुळेच जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी कोरेगाव तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकण्याचा, तसेच पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यांना कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यावरून पक्षाची लोकप्रियता स्पष्ट होत आहे. निवडून येण्याची क्षमता, हा उमेदवारीसाठी निकष असून, यासंदर्भात रामराजे निंबाळकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण एकत्रितपणे अंतिम निर्णय घेतील. अशा नेतेमंडळींनी ठरवलेल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहेत. पक्षाच्या माध्यमातून तिन्ही आमदारांनी तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. विकासाची दृष्टी असलेली नेतेमंडळी राष्ट्रवादीकडे असल्यामुळे सर्वसामान्य जनता देखील पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी असल्याचे या निवडणुकीतही दिसून येईल. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसने विकासासाठी काय केले, या मुद्द्यावर फारशी चर्चा न करता राष्ट्रवादीने केलेला विकास व आगामी काळासाठी पक्षाने तालुक्‍याच्या विकासासंदर्भात आखलेले धोरण मतदारांपुढे ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. त्यामुळे जनतेचा कौल राष्ट्रवादीच्याच बाजूने राहील, यात तीळमात्र शंका नाही.
- भास्कर कदम, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी रिंगणात
ता लुक्‍यात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढविणार आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटनेशी प्राथमिक बोलणी सुरू आहेत. तालुक्‍यात जिल्हा परीषदेच्या सर्व गटांमध्ये व पंचायत समितीच्या सर्व गणांमध्ये उमेदवार उभे केले जाणार आहेत.

तालुक्‍यामध्ये विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. जलयुक्त शिवार योजना गावोगावी राबविणार, वाडी-वस्तीवर सर्व प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य देणार, तालुक्‍यातील रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याचा उद्देश आहे.

कोरेगावातून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासह बाह्यवळण रस्त्याच्या कामालाही प्राधान्य राहणार आहे. रेडे घाट, तसेच डिस्कळ- अनपटवाडी रस्ता, शेल्टी- विसापूर रस्ता, अशा प्रमुख मार्गांची कामे मार्गी लावली जातील. ग्रामीण विकासाला अधिक महत्त्व देऊन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून गावोगावी विकासाची कामे पोचवण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून जे- जे करणे शक्‍य आहे, ते सर्व करून तालुक्‍याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचे पक्षाचे धोरण आहे. तालुकापातळीवर नुकत्याच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतींना कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

समविचारींना बरोबर घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटनेशी प्राथमिक बोलणी सुरू आहेत. या दोन्ही पक्षांना काही जागा देण्याच्या मुद्द्यावरही विचार सुरू आहे.

- सोपानराव गवळी, तालुकाध्यक्ष, भाजप

विकासकामे समोर मांडून निवडणूक लढविणार
शिवसेनेचा सत्तेत सहभाग असल्याने पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात झालेली विकासकामे, विशेषतः जलक्रांतीसाठी उपयुक्त ठरणारी विविध कामे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेपुढे मांडणार आहे. तालुक्‍यात सध्या जलक्रांतीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. त्यास केवळ शिवसेना कारणीभूत आहे. शिवसेना सत्तेत सहभागी असल्याने जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्याकडे पालकमंत्रिपद आहे. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. वसना नदीवर सोळशी ते पळशी या भागांत तब्बल १२ कोटींचे बंधारे मंजूर करून घेण्याला यश आले आहे. त्याचबरोबर वसना नदीची उपनदी वांगणा नदीवर देखील पाच सिमेंट बंधारे मंजूर करून घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने यापूर्वी अशा पाण्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयाकडे अन्य पक्षांनी कधीच लक्ष दिले नव्हते. दुसऱ्या टप्प्यात वसना नदीवर पळशी ते शिरढोण या भागांत नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणार आहे. हा प्रस्तावदेखील शासनाकडे पाठवला आहे.

तालुक्‍याच्या विद्यमान आमदारांनी भूमिपूजन केलेल्या प्रामुख्याने भक्तवडी, रेवडी, शेंदूरजणे या भागांतील पाच कोटींच्या रस्त्यांच्या कामांनाही शिवसेनेमुळेच मंजुरी मिळाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एवढे कर्तबगार आहेत, तर यापूर्वीच ही कामे मार्गी का लागली नाहीत? शिवसेनेमुळे झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा सध्या आटापिटा सुरू आहे.

शिवसेनेला श्रेय घेण्यात रस नाही; परंतु शिवसेनेमुळे झालेली कामे जनतेपुढे मांडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल मागणार आहे.

- बाळासाहेब फाळके, तालुकाप्रमुख, शिवसेना

Web Title: politics in satara