सोलापुरात सहकारमंत्र्यांवर पालकमंत्र्यांची मात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

सोलापूर - महापालिका स्वीकृत नगरसेवकपदी दोन्ही जागांवर स्वतःच्या समर्थकांची वर्णी लावून पालकमंत्री विजय देशमुख यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर मात केली. सहकारमंत्र्यांचे कट्टर समर्थक अविनाश महागावकर यांचे नाव एनवेळी बदलून, पालकमंत्र्यांचे समर्थक प्रभाकर जामगुंडे यांची वर्णी लागली. या घटनेमुळे दोन्ही देशमुखांतील शीतयुद्धाला पुन्हा तोंड फुटले आहे. भाजपकडून स्वीकृत सदस्य म्हणून आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी मुन्ना वानकर यांचे नाव अंतिम झाले, दुसरे नाव निश्‍चित करण्यासाठी दोन्ही गटांच्या पदाधिकारी व नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागली.

भाजपच्या नावावर एकमत होत नसल्याने सभा सुरू होण्यास उशीर झाला. सभा सुरू होऊनही नावे निश्‍चित न झाल्याने महापौर शोभा बनशेट्टी यांनी सभा एक तासासाठी तहकूब केली. सभा पुन्हा सुरू झाल्यावर प्रभारी आयुक्त अरुण डोंगरे यांनी जामगुंडे यांच्यासह पाच स्वीकृत सदस्यांची नावे वाचली, त्या वेळी पालकमंत्र्यांच्या समर्थक नगरसेवकांनी जल्लोष केला.

Web Title: politics in solapur